एका जिद्दीचा प्रवास


स्त्रियांना वर्ज्य असणाऱ्या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे र्मचट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणा-या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया.
एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या स्वप्नांना साकार करण्यासाठी केवळ जिद्द लागते. जिद्दीशिवाय खडतर स्वप्न साकार करणं कठीणच. त्यातही सर्वसामान्य घरात जन्मलेल्या महिलांना तर ते त्याहून कठीण. लहानपणापासूनच विविध क्षेत्रांत आपलं नाव उमटवणा-या रेश्माला एका अशा क्षेत्रात काम करायचं होतं जिथे स्त्रियांनी जाण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल.
बारावी झाल्यावर नक्की कोणतं क्षेत्र निवडायचं याविषयी तिच्या मनात खलबतं सुरू होती. खरं तर तिला पायलट व्हायचं होतं. मात्र त्यावेळेस पायलटसाठी तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र तिने हिरमुसून न जाता एका वेगळ्या करिअरचा शोध घेत राहिली. याच शोधात असताना र्मचट नेवीविषयी माहिती सांगणा-या व्याख्यानाबद्दल तिला कळलं. र्मचट नेवी हे क्षेत्र रेश्माला वेगळं वाटलं, त्यामुळे हे व्याख्यान ऐकण्याची तिची इच्छा झाली. व्याख्यानात या क्षेत्राविषयी तिने ऐकलेली माहिती तिला फार आवडली.
काहीतरी आव्हानात्मक, कठीण, अशक्य करण्याची तिची धडपड या र्मचट नेवीच्या करिअरमुळे पूर्ण होणार होती. त्यामुळे आता याच क्षेत्रात तिला जाण्याची इच्छा झाली. या क्षेत्रात आल्यावर स्वत:चं वैयक्तिक आयुष्य लांब होतं. घरच्यांपासून वर्षानुवर्षे दूर राहावं लागतं. अथक परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो. लहानपणापासून खेळ, नृत्य अशा गोष्टींमध्ये अव्वल असणारी रेश्मा आता मरिन क्षेत्रात जाऊ पाहत होती. आपली मुलगी इतरांच्या पावलांवर पाऊल न ठेवता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करतेय हे तिच्या पालकांना जाणवलं आणि त्यांनीही तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं.
मुळातच अभ्यासू विद्यार्थी असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्याआधी तिने या क्षेत्रात येणा-या सर्व गोष्टी तपासल्या. म्हणजेच शिक्षण झाल्यावर नोकरी कशी मिळते, पगार किती असतो, सर्वात वरची पोस्ट कोणती? त्यासाठी किती अभ्यास लागतो? त्या अभ्यासाला किती वर्षे जातात? या सा-या गोष्टींची खातरजमा करून तिने अभ्यासाला सुरुवात केली.
या मुलाखतीत ती बोलताना तिने सांगतिलं की, ‘मला एकतर आकाशात उडायचं होतं किंवा पाण्यावर राहायचं होतं. वस्तुत: जमिनीवर नसतानाही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ती र्मचट नेवीमध्ये चिफ ऑफिसर आहे. नेहमीच्या मार्गावर चालून, १० ते ५ नोकरी करून घर-संसार सांभाळायचा एवढया माफक अपेक्षा मुलींच्या असतात. मात्र या अपेक्षांना छेद देत आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तिला वाटतं.
या क्षेत्रात काम करण्याविषयी आणि काम करताना आलेल्या अडचणींविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘मुळातच या क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी फार आहे. शिवाय आपल्या या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करावा अशी काही लोकांची इच्छाही नसते. पुरुषांच्या समुदायात राहून त्यांच्यासोबत मिळून-मिसळून काम करणं फार कठीण आहे. त्यांच्यात समरस होण्यासाठीच फार वेळ लागतो. कठीण काम असल्यामुळे महिलांना एखादं काम जमणारच नाही अशी समजूत पुरुषांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन करणं सर्वप्रथम काम मानलं जातं. आपल्या सहका-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टया सक्षम राहणंही तितकंच गरजेचं आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘शिपमध्ये असल्यामुळे निसर्गातले अनेक चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. सूर्य क्षितिजाला जाताना त्याचा होणारा लालबुंद रंग म्हणजे नैसर्गिक जादूच वाटते. असे विविध निसर्गातील चमत्कार नेहमी अनुभवता आले.’
‘जेव्हा मी पहिल्यांदाच बोर्ड-शिपवर गेले तेव्हा प्रत्येक ऑफिसर मला एकच प्रश्न विचारत होते की, का तू र्मचट नेव्हीमध्ये यायचं ठरवलंस? या निर्थक प्रश्नांमुळे मी कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचे, शिवाय माझ्यातला आत्मविश्वासही कमी व्हायचा. आजही महिलांना त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी जर कष्ट पडत असतील तर महिलांनी केवळ चूल आणि मूल याच संकल्पनेत रमायचं का?’ असं ती म्हणते.
‘र्मचट नेवीमध्ये करिअर करण्याचा माझा निर्णय किती चुकीचा आहे असं काहींनी मला येथे जाणवून दिलं. मात्र या टिपिकल संकल्पनेतून मला समाजाला बाहेर काढायचं होतं. कालांतराने माझं काम पाहून माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पुरुषांप्रमाणे मीही काम करू शकते, असं त्यांना जाणवलं आणि अल्पावधीतच माझे वरिष्ठ माझ्यावर विश्वासाने काम सोपवू लागले. र्मचट नेवीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर मी जेव्हा तिकडे रुजू झाले त्यावेळेस माझ्या मापाचे युनिफॉर्म तिथे उपलब्धच नव्हते,’असं रेश्मा सांगत होती.
रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणं खरं तर फार अवघड काम आहे. वेगळी वाट धरणा-या महिलांच्या आयुष्यात अनेक संकटंही येतात; मात्र ती संकटं दूर सारून त्यातूनही नवा दृष्टिकोन साधून जी स्त्री नैया पार करते तिलाच आजची खरी सक्षम स्त्री म्हणायला हवं, त्यामुळे रेश्मा मुरकरही त्यापैकीच एक आहे. आज ती र्मचट नेवीमध्ये चीफ ऑफिसर पदावर आहे.
विचार केला नसेल अशा सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळतायत. या सा-या यशामागे तिच्या आई-वडिलांनी तिला मोलाची साथ दिली म्हणून ती पुढे जाऊ शकली असं ती अभिमानाने सांगते. खेळ, कला आणि अभ्यास अशा सा-या गोष्टींचा यथासांग मेळ घालत तिने तिची सारी स्वप्नं पूर्ण केलीत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात रेश्माने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली हे आजच्या महिला दिनाच्या दिवशी सांगणं म्हणजे फार कौतुकाची गोष्टच ठरेल ना!

Comments

Popular Posts