नववधूच्या मनातील भाव टिपण्यासाठी...

All rights reserved

स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली झाली आणि महिलांनी विविध क्षेत्र पादक्रांत करायला सुरुवात केली. चाकोरीबद्ध करिअर निवडून स्वतःचं आयुष्य केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 एवढ्यापुरतं मर्यादित ठेवण्यापेक्षा काहीतरी निराळं करावं या हेतूने आजकाल कित्येक तरुणी करिअरच्या वेगळ्या वळणावर चालताना दिसतात. जिथं पुरुषांची मक्तेदारीच नाहीतर केवळ पुरुषांचाच हक्क आहे अशा क्षेत्रातही अनेक मुलींनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. असंच एक क्षेत्र म्हणजे वेडिंग फोटोग्राफीचं. लग्नसोहळ्याच्या व्यासपीठावर हातात कॅमेरा घेऊन इथं-तिथं धावणारा फोटोग्राफर आपण पाहतोच, पण आजकाल कित्येक लग्नसोहळ्यात महिला फोटोग्राफर्सचा वावर वाढल्याचं दिसून येतंय. सुरुवातीला थोड्या महिलांना पाय रोवणं जरा कठीण गेलं मात्र सध्या या क्षेत्रात महिलांनाही चांगले दिवस आल्याचं फोटोग्राफर प्रियंका किर्जत सांगते. 
रचना संसदमधून फोटग्राफीचे धडे घेतलेली प्रियंका किर्जत म्हणते की, पूर्वीपासून या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व होतं. त्यामुळे या क्षेत्रात वावरताना काही अडचणी निश्चितच येतात. त्यातही मुलींना फोटोग्राफीमधलं काय कळतंय हा समज आजही समाजमनावर आहे. हा समज दूर करण्यासाठी आणि या क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी कित्येक तरुणी धडपडतात. त्यांच्या याच धडपडीला थोड्याफार प्रमाणात यश येतंय. क्षेत्र कोणतंही असलं तरीही त्यात आत्मविश्वासाने काम केलं की सारंकाही सोपं होऊन जातं. शिवाय आपल्या घरच्यांचा पाठिंबा असणंही फार महत्त्वाचं आहे. सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिलाय. मुळात मला लहानपणापासून फोटोग्राफीची एवढी आवड होती की ती आवड पाहून घरच्यांनीच मला हे करिअर निवडण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मी फोटोग्राफीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन वेडिंग फोटोग्राफी करायला सुरुवात केली.
पुढे ती म्हणते की, फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला फार अडचणी आल्या. त्यातही लग्नातले फोटो म्हणजे प्रत्येकासाठी फार मोलाचे असतात. हे लग्नातले क्षण आयुष्यभर सोबत राहतील यासाठी उत्तम फोटोग्राफर लग्नात असावा असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे चांगल्यातला चांगला फोटोग्राफर निवडला जातो. पण मुलींना फोटोग्राफीमधलं काहीच कळत नाही असा समज असल्याने आम्हाला ऑडर्स मिळणं फार जिकरीचं झालं होतं. तसंच, काहीवेळा लग्नसोहळे, रिसेप्शन उशीरापर्यंत चालतात. त्यामुळे मुलींना फार कमी ऑडर्स मिळत असत. पण आता लोकांचा दृष्टिकोन बदलतोय. लग्नसोहळ्यासारख्या प्रसंगी नवरीच्या चेहर्‍यावरचे हावभाव टिपण्यापासून ते मेकअपरुममध्ये चाललेल्या तिच्या मेकअपचे कॅन्डीड फोटो काढण्यापर्यंत आजकाल खास महिला फोटोग्राफर्सना बोलावलं जातं. मलाही सुरुवातीला फार अल्पप्रतिसाद मिळाला. पण मिळालेल्या प्रतिसादातून पुढे पुढे कामं मिळत गेली. पण काम मिळाल्यानंतरही कित्येकजण मुलीकडून फोटो काढून घेण्यास कचरत असत. लग्नसोहळ्याव्यतिरिक्त जे कॅन्डीड किंवा पाहुण्यांचे फोटो असतात त्यासाठी कोणी हक्काने बोलवत नसत. पण आता या दीड ते दोन वर्षांच्या अनुभवातून मला एक वेगळा बदल दोन महिन्यांपासून जाणवू लागलाय. मुलीनही वेडिंग फोटोग्राफीसाठी लोकांनी अ‍ॅक्सेप केल्याचं दोन महिन्यात प्रकर्षानं जाणवलं. हा बदल फार वेगळा आहे. मुलगी फोटोग्राफी करतेय म्हटल्यावर फार कौतुक वाटतंय. वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे अनेकजण शाबासकीची थापही देतात. तेव्हामात्र भरून आल्यासारखं वाटतं. आपण निवडेलला मार्ग चुकीचा नाही हेच यातून कळतं.’

वेगवेगळ्या क्षेत्रात मुलींनी फक्त उडीच घेतली अशातला भाग नाही, त्यांनी त्यात आपलं वर्चस्वही सिद्ध केलंय. एखादा पुरुष नवरीच्या मनातील भाव टिपू शकत नाही. त्यासाठी एक महिलाच असावी लागते. आणि वुमेन वेडिंग फोटोग्राफरची हिच खासियत आहे. लग्नसोहळ्यात नवरीच्या मनातील हावभाव जेव्हा तिच्या चेहर्‍यावर उतरतात तेव्हा तिच्याही नकळत ते कॅमेर्‍यात कैद केले जातात आणि यासाठीच आजकाल महिला फोटोग्राफर्सना मागणी वाढत जातेय. प्रियंकाने सांगितलेला हा अनुभव केवळ तिच्यापुरता नाहीए. तिच्यासारख्या अनेक तरुणी या क्षेत्रात आपला पाय घट्ट रोवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या प्रत्येक धडपडीला यश येणं हे त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे असंही प्रियंका सांगते. 

Comments

Popular Posts