समाजपरिवर्तनासाठी झटणार्‍या रणरागिणी


जनजागृती, मार्गदर्शन करण्यासाठी कोळेगावातील महिला संघटित
समाजाचा विकास साधायचा असेल तर तळागळापासून सुरुवात व्हायला हवी, त्यासाठी गावागावातून महिलांनी पुढे यायला हवे, महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय समाजाचा विकास साध्य होऊ शकत नाही असा बौद्धिक विचार करणार्‍या स्त्रिया चार घरची धुणी-भांडी करून संसाराचा गाडा सांभाळणार्‍या आहेत असं जर कोणी सांगितलं तर तम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील स्त्रियांना, तरुणांना योग्य मार्गावर नेण्यासाठी डोंबिवलीमधील कोळेगावातील सामान्य महिला एकत्र आल्या आहेत. त्यांच्या संघटनेतून त्यांनी महिला सक्षमीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन, व्यसनमुक्ती केंद्र, नागरी हक्क, कौटुंबिक सल्ला आदी विषयांना हाताशी धरून कार्य सुरू केले आहे.
तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणारी अनुभूती ही संघटना या महिलांच्या पाठिशी आहे. अनुभूती संघटनेमार्फत तळागळातील लोकांना त्यांच्या एकंदरीत न्याय हक्कांविषयी माहिती दिली जाते. एका विशिष्ट कालावधीत ही संघटना संबंधित ठिकाणी काम करते. मात्र आपण गेल्यानंतरही तिथे समाजप्रबोधनाचे काम सुरू राहण्यासाठी अनुभूती संघटना तेथील महिलांनाच हाताशी धरते. त्यांना प्रशिक्षण देते आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. साधना बाविस्कर, अर्चना पाटील, मंदा पाटील, आशा देशमुख, वनिता जाधव, छाया गाडगीळ, जयश्री कांबळे या त्यातील काही सर्वसामान्य महिला. कोणी टेलरिंगचा व्यवसाय करतं तर कोणी धुणी-भांडी. पण आज त्यांना समाजात वेगळा मान आहे. कारण त्यांनी हाती घेतलेली चळवळ तितकीच महत्त्वाची आहे. आपले नागरी हक्क काय आहेत? एखादी समस्या उद्भवल्यावर आपण कोणाकडे दाद मागायची? कौटुंबिक कलाहात कोणाची मदत घ्यावी? असे अनेक छोटे-मोठे प्रश्न आपल्या अवती-भोवती फिरत असतात. या प्रश्नांची नेमकी उकल होत नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. याच प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या ग्रामीण भागातील महिला अनुभूती संघटनेमार्फत करतात. विविध विषयांवर कार्यशाळा घेऊन या महिला समाजात जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यांनी आजवर महिला सक्षमीकरण, रेशनिंग हक्क, करिअर मार्गदर्शन आदी विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळांना त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. अशा कार्यशाळा प्रत्येक गावा-गावात व्हायला हव्यात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. फक्त या कार्यशाळांसाठी त्यांना शासनाचाही पाठिंबा हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाठपुरावाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

घरकाम करणार्‍या साधना बाविस्कर म्हणतात की ‘सुरुवातीला मी चार चौघात साधं बोलूही शकत नव्हते, मात्र आता मला माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला आहे. महिलांच्या कोणत्याही समस्यांवर मी आता बिनधास्त बोलू शकते. त्यांना मार्गदर्शन करू शकते.

नागरी हक्कांविषयी माहिती देणार्‍या अर्चना पाटील म्हणतात की, ‘आम्ही हे काम हाती घेतलं तेव्हा आम्हाला बर्‍याच अडचणी आल्या. समाजातील अनेकांनी आम्हाला दुषणं दिली. एवढंच नव्हे तर आमच्यापैकी कित्येकांच्या घरातूनही विरोध झाला. पण आता आम्ही काहीतरी करू शकतो यावर त्यांचाही विश्वास बसला आहे. लोक विश्वासाने त्यांच्या समस्या आमच्यापर्यंत मांडायला येतात. आम्ही आमच्या परीने त्या वरच्या पातळीवर नेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.’

अनुभूती संघटनेच्या सहकार्याने कोळेगावातील महिलांनी सुरू केलेला समाजपरिवर्तनाचा प्रवास त्यांना केवळ गावपातळीवर ठेवायचा नाही. विभागात बदल घडवून आणायचा असेल तर शासनाचीही तेवढीच मदत हवी. त्यामुळे अनुभूती संघटना सध्या सरकारपक्षाकडून सहकार्याची अपेक्षा करते आहे. शासनानेही जर अशा तळागाळातील चळवळींना, कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले तर ग्रामीण भाग सुधारण्यास लवकर मदत होईल असे अनुभूती संघटनेच्या संस्थापिका दिपा पवार आणि अमृता सांगतात. 

Comments

Popular Posts