वारी व्हायरल होतेय !





कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात टाळ, खांद्यावर झोळी आणि हातात एखादा डिएसएलआल कॅमेरा, असा तरुण वारकरी सध्या वारीच्या वाटेवरून चालताना दिसतोय. वारकर्‍यांचा उत्साह, त्यांचे छोटे-मोठे हावभाव, वारीतील प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करण्यासाठी सध्या तरुणाईची धडपड दिसतेय. आजकाल सोशल मीडिया सुरू केलं की न्यूज फिडमध्ये सहज वारीतले फोटो दृष्टीस पडतात, वारीतील प्रत्येक अपटेड सोशल मीडियामार्फत समजली जाते. स्वत:च्याच गुर्मीत जगणारी तरुण मंडळी वारीच्या पायवाटेवर का चालायला लागली असतील असा प्रश्न पडतो. तरुणांना अध्यात्माची गोडी लावण्यासाठी तरुणांचीच एक फौज पुढे आली आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात वारकर्‍यांचा हा जल्लोष पुढची अनेक शतके अशीच राहण्यासाठी या तरुणांनी वारीला स्मार्ट टच दिला आहे. अक्षय भोसले हे त्या तरुणांच्या फौजतील मुख्य सरदार असून वारीतील तरुणांची वाढलेली संख्या पाहता तरुणाई नेमकी वारीकडे कशी वळली हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
ज्येष्ठ मासात शेतीची प्राथमिक कामं उरकली की अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागतं ते वारीकडे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निघणार्‍या दिंड्या, दिड्यांसोबत पायी निघालेला वारकरी, उन-पाऊस-वारा या कशीचच तमा न बाळगता अविरत सुरू असलेला प्रवास आषाढी एकादशीला संपतो आणि कंबरेवर दोन्ही हात ठेवून अठ्ठावीस युगे उभा असलेल्या त्या सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी एकच झुंबड उडते. संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली आणि त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम महाराजांनी सुरू ठेवलेली ही वारकरी परंपरा गेल्या कित्येक शतकांपासून महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र आता प्रत्येक वारकरी शेतकरी नाही. उदरनिर्वाहासाठी इतरस्त्र स्थायिक झालेल्या वारकर्‍याला प्रत्येक वर्षी वारीला जायाला मिळतंच असं नाही. वारीला जायाला न मिळाल्याने मनाला लागलेली रुखरुख, माऊलीचं दर्शन न घेता येण्याची खंत सतत या वारकर्‍यांच्या मनात लागून राहिलेली असते. नेमकी हीच खंत ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी घेरली आणि सुरू केली अक्षयवारी. अक्षयवारी म्हणजे, वारीतील प्रत्येक क्षण, वारीतील प्रत्येक अनुभव तुमच्या आमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवणं.
भारती विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक  टेलिकम्यूनिकेशनचे अभ्यासक   तरुण ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले यांनी प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर व प.पू.श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्याची सात वर्षांपूर्वी स्थापन केली. या मंचासाठी ह.भ.प.माधवदासमहाराज राठी, शशिकांत काटे, सदानंद बग, विनीत सबनीस, नीलेश ढोमसे, प्रदीप वडणे, जयश्री पाटील, श्रीकांत खंडागळे, दिनेश काटे , सचिन पुजारी  यांची मदत मिळाली. यानंतर अक्षयमहाराज यांनी स्वतःचा ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगमार्फत त्यांनी त्यांचे विचार, संतांचे विचार जगभर पसरवायला सुरुवात केली. त्यांच्या या ब्लॉगला जगभरात हजारो वाचक आहेत. एवढेच नव्हे तर आपली संस्कृती, परंपरा इतर देशातही कळावी याकरता त्यांनी इंग्रजीतूनही लेखन करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी वारीविषयी लाईव्ह अपडेट प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षयवारी हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी आजवर जवळपास ७० हजार लोकांना जोडले आहे. त्यांच्या एका स्मार्टफोनमधून वारीची लाईव्ह माहिती एका क्लिकवरून ७० हजार लोकांना प्राप्त होते. कोणती दिंडी कुठे आहे?, दिंडीचा मार्ग कसा आहे?, कार्यक्रम, वातावरण आणि महत्त्वाचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप ब्रोडकास्टवरून अक्षयवारी या उपक्रमाअंतर्गत पाठवले जातात. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण, वृक्षसंवर्धन याकरिता ही सारी मंडळी वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्रच्या माध्यमातून कार्य सुरु आहे.
सात वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम इतका गाजला की वारीतील प्रत्येक लाईव्ह अपडेटला भारावून वाचकांनीही वारीला जायाला सुरुवात केली आहे. अक्षयमहाराज याबद्दल सांगतात की, मी आजवर अक्षयवारीच्या निमित्ताने ७० हजार लोकांपर्यंत पोहोचलो. गेल्यावर्षी या उपक्रमात सामील असलेले  ५०० हून अधिक तरुण यंदा स्वतःच वारीचा अनुभव घ्यायला वारीला चालत आहेत. हेच अक्षयवारीचं उद्दिष्ट होतं, जे आता हळूहळू साध्य होतंय.
काळानुसार बदलावं असं म्हणतात, तरच माणूस टिकून राहू शकतो. संस्कृती आणि परंपरांचही तसंच असतं. काळानुरुप संस्कृती, परंपरामध्येही बदल होत गेले की ते कायमस्वरुपी टिकू शकतात. त्यामुळे आपली हिच संस्कृती टिकून राहावी असं अक्षय महाराज यांना वाटलं आणि म्हणूनच आजच्या तरुणांची नस ओळखून त्यांनी वारीला स्मार्ट आणि डिजिटल टच देण्याचा प्रयत्न केला. अक्षयवारीच्या निमित्ताने अक्षय महाराज म्हणतात की ‘वारी अलिकडे व्हायरल होतेय. तरुणांना वारीविषयी आकर्षण वाटू लागलंय. परवा सासवडजवळ दिंडी आली असताना माझ्या दृष्टीस काही कॉलेजची तरुण मंडळी दिसली. वारीतून येणार्‍या ज्येष्ठ मंडळींचे पाय चेपून देण्यापासून ते इतर सेवा ही तरुण मंडळी करत होते. हे दृष्य पाहून मनाला समाधान मिळालं. ज्या हेतूसाठी हा उपक्रम सुरू केला होता तो हेतू साध्य होताना पाहणं फार आनंदाचं असतं.’
ही वारी फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. वारीला डिजिटल टच मिळाल्यामुळे भारताबाहेरही अनेक वारकरी भक्तांना वारीतील अपडेट्स मिळताहेत. ऑस्ट्रेलियात राहणारे डॉ.निरंजन पाटील या उपक्रमामुळे वारीशी आजही जोडलेले आहेत, असे अक्षयमहाराज सांगतात. एवढेच नव्हे तर, आपली ही परंपरा अमराठी समाजाला आणि परदेशी नागरिकांनाही कळावी याकरता अक्षयमहाराज हे संत ज्ञानेश्वरांपासून आताचे ज्येष्ठ अभ्यासक देगलूरकर महाराजांपर्यंतचे सारे विचार इंग्रजीत ट्रान्सलेट करून लोकांपर्यंत पोहोचवतात.
आपल्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणं हे सर्वस्वी आपल्याच हाती असतं. प्रत्येक काळानुसार ही संस्कृती थोड्याफार फरकाने बदलत जात असली तरीही टिकली पाहिजे असं अक्षयमहाराज यांना वाटतं. त्यामुळे संस्कृतीच्या, परंपरांच्या संवर्धनासाठी तळमळीने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात त्यांना मुंबईतून जवळपास २० ते २५ तरुण मदत करतात. एखादी अपटेड द्यायची असेल तर अक्षय महाराज या तरुणांशी संपर्क साधतात. मग त्यांचा हा चमू ते अपडेट जवळपास ७०  हजार लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे तुमच्या आमच्या हाती असलेला स्मार्टफोन आपल्या आधुनिकतेची ओळख असली तरीही त्याच आधुनिकतेचा वापर करत आपल्या जुन्या परंपरा जपण्यासाठी ही तरुण मंडळी झटताना दिसताहेत.

अक्षयवारी उपक्रमात सहभागी होण्यासाठी ८४५१८२२७७२ या क्रमांकावर अक्षयवारी हा संदेश पाठवावा .

Comments