मराठमोळी युट्यूबर


सध्या युट्यूबची सगळीकडे क्रेझ आहे. इतर सोशल मीडिया अ‍ॅपपेक्षा युट्यूबवर तरुणाई जास्त रमतेय. वेब सिरीज, स्टॅण्ड अप कॉमेडी यासोबतच फूड व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉगची प्रेक्षक संख्याही अधिक आहे. दिवसेंदिवस प्रेक्षक संख्या वाढत जात असल्याने तरुणाईने यातच आपलं करिअर करायचं ठरवलं आणि असंख्य युट्यूब चॅनेलची निर्मिती झाली. ज्यांनी युट्यूबसाठी मनापासून आणि सलग काम केलंय त्यांना यात अभूतपूर्व यश मिळालंय आणि त्यांची चाहते संख्याही वाढलीय. कोणीतरी येऊन आपल्याला संधी देईल यापेक्षाही आपली संधी आपणच निर्माण करावी या हेतूने युट्यूबकडे पाहिलं जातंय. मुक्त व्यासपीठ म्हणूनही युट्यूबची ख्याती वाढतेय. अशाचप्रकारे स्वतःचं व्यासपीठ स्वतःच तयार करणारी एक मराठमोळी युट्यूबवर सध्या युट्यूबवर प्रचंड गाजतेय. स्मिता पावसकर असं तिचं नाव असून ‘मराठी कन्या’ या तिच्या मराठी चॅनेलने 27 हजारहून अधिक सबस्क्रायबर्सचा पल्ला पार केलाय.
पॉलिटिकल सायन्समध्ये बी.ए केलेल्या स्मिता पावसकर हिने दीड वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला वहिला व्हिडिओ अपलोड केला. तिला पहिल्याच व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळाला. यातूनच तिचा हुरूप वाढला आणि तिने विविध विषय हाताळून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
स्मिता याबाबत सांगते की, ‘मला युट्यूबवर वेळ घालवायला फार आवडयाचा. वेब सिरीज, स्टॅण्ड अप कॉमेडीसारखे व्हिडिओ मी पाहायचे. पण यामध्ये कोणीही मराठी मुलगी मला दिसली नाही. आणि ज्या मराठी मुली आहेत त्यांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषेला महत्त्व दिल्याने मराठी मागेच राहिली. युट्यूबसारख्या क्षेत्रात मराठीचा वापर फार कमी झालाय त्यातच मराठी मुली आजही या क्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे मी या क्षेत्रात यायचं ठरवलं.’
कॉलेज झाल्यानंतर स्मिता जवळपास 4 वर्ष कल्याणच्या एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. सोबतच तिचे कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण सुरू होतं. कथ्थक म्हणजे एका नृत्यांगणासाठी साधना असते असं स्मिता म्हणते. कालांतराने काही वैयक्तिक कारणाकरता तिने नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर तिने नृत्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत तिने कथ्थकच्या चार परिक्षा दिल्या आहेत, आता ती पाचव्या परिक्षेसाठी तयारी करतेय. नोकरी सोडल्यानंतर ती युट्यूबला प्रचंड अ‍ॅडिक्ट झाली. आपणही असंच काहीतरी करावं असं तिला वाटू लागलं. तसंच, फार कमी मराठी मुलींनी युट्यूबकडे करिअरच्या दृष्टीने पाहिलं होतं. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू करावं अशी तिची इच्छा झाली. तिच्या या इच्छेसाठी तिच्या कुटुंबानेही भरपूर साथ दिली. तिच्या भावाने कॅमेरामनची जबाबदारी सांभाळली आणि पहिला व्हिडिओ शूट केला. चाळीतील आणि इमारतीतील मराठी सण कसे साजरे केले जातात किंवा त्यामध्ये काय फरक आहे असा विषय घेऊन तिनं व्हिडिओ शूट केला आणि तो तुफान गाजला. पहिल्याच व्हिडिओला तिला मिळालेला प्रतिसाद पाहून तिने दर आठवड्याला असे विविध विषय घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
युट्यूबर असणं काही सोपं नसतं. प्रत्येकवेळी नवा कॉन्टेट तयार करावा लागतो. इतरांपेक्षा आपलं काम युनिक असावं लागतं. त्यामुळे निरिक्षण शक्ती, परिक्षण करणं, माणसांच्या सवयी यावर सतत लक्ष द्यावं लागतं असं स्मिता म्हणते. आपल्या व्हिडिओला कितीही व्ह्यूज मिळाले तरी चॅनेलला सस्क्रायबर्स असणंही महत्त्वाचं आहे. आपलं चॅनेल कोणीतरी सबस्क्रायब करणं म्हणजे प्रेक्षकानं एकाप्रकारे आपल्याला फॉलो करण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्या फॉलोअर्सना सतत काहीतरी चांगलं देत राहणं आपलं कर्तव्य आहे. तसंच, सध्या प्रचंड स्पर्धा वाढतेय. अनेक सृजनशील तरुण या क्षेत्रात येताहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याला सतत सतर्क राहावं लागतं, सतत नवीन आणि दर्जेदार कॉन्टेट द्यावा लागतो असं स्मिता म्हणते. त्याचप्रमाणे ट्रेडिंगमध्ये काय आहे यापेक्षा आपणच वेगळा ट्रेन्ड निर्माण करावा असंही स्मिता म्हणते. म्हणूनच तिचे व्हिडिओ नेहमी हटके असतात.
स्मिताला लहानपणापासूनच कलेची आवड होती. त्यामुळे तिनं शाळेत असल्यापासूनच नृत्य, अभिनयाची आवड जपली. तीच आवड आता तिला उपयोगाला येतेय. एवढंच नाही तर युट्यूबर असण्यासाठी ऑलराऊंडर असणं गरजेचं आहे. युट्यूबर म्हणून सुरुवात करताना स्मिता स्वतः व्हिडिओ एडिंटींग, व्हिडिओ दिग्दर्शन करायला शिकली. कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेसशिवाय स्मिताने स्व-प्रशिक्षणाला महत्त्वं दिलं आणि घरच्या घरी सरावाने एटीडींग करू लागली. सोबत भावाची साथ होतीच, त्यामुळे तिला सारं काही सोपं गेलं.
ती म्हणते की, मी कधीही स्वतःसमोर टार्गेट ठेवलं नाही. म्हणूनच सुरुवातीला जेव्हा माझे 100 सबस्क्रायबर्स झाले तेव्हा मला मोठा टप्पा पार केल्याचा भास झाला. आताही 27 हजारांहून अधिक सबस्क्राबर्स झाले तरी माझा आनंद आजही तेवढाच आहे. येत्या काळात ही संख्या निश्चितच वाढणार. पण कोणतीही अपेक्षा किंवा कोणतंही टार्गेट मनाशी न धरता मी मनापासून काम करण्याला जास्त प्राधान्य देत असल्याने मला माझा एक-एक प्रेक्षकही फार महत्त्वाचा वाटतो.
मराठी कन्या या चॅनेल अंतर्गत स्मिताने प्रेक्षकांशी जोडून घेतलंय. दीड वर्षांपूर्वी इतरांसारखीच सर्वसमान्य असणारी तरुणी आता सेलिब्रिटी झालीय. प्रवासात असताना तिला सहज तिचे चाहते वर्ग लगेच मराठी कन्या म्हणून हाक मारतात. पण मनात कोणताही गर्व न बाळगता ती लगेच आपल्या चाहत्यांशी बोलायला सुरुवात करते. यातूनच तिच्या चाहते वर्गात आणखी वाढ होत जातेय. तसंच, फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यामातूनही तिने प्रेक्षकांशी संवाद सुरू ठेवला आहे. 

Comments

Popular Posts