पारधी समाजाच्या ‘क्रांती’कारक

गावकुसाबाहेर पाल्यात राहणारा पारधी समाज स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही दुर्लक्षित आहे. सरकारने त्यांच्या उन्नतीसाठी करोडो रुपयांचे अनुदान जाहिर केले असले तरीही प्रत्यक्षात या समाजासाठी त्यातील एकही रुपया खर्च झालेला नाही. एवढेच नव्हे तर हा समाज आजही चोरटे म्हणून हिणवला जातो. तसेच, सरकारनं त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनही हिरावून घेतलंय. या समाजात आजही जनजागृती झालेली नाही, या समाजातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेली नाहीत, जी मुलं शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना शाळेत वेगळं बसवलं जातं. अशा कित्येक अन्यायकारक गोष्टी या समाजासोबत होत असताना एकही राजकीय नेता यांच्याबाजूने उभा राहत नाही. अशावेळी त्या समाजातीलच एक व्यक्त पुढे येते आणि आपल्या मागण्या समाजापुढे मांडते. तसंच, या समाजाचं वास्तव समाजापुढे यावं, या समाजातील लोकांना इतरांप्रमाणेच मानानं वागणूक मिळावी याकरता सुनिता भोसले गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांच्या वाट्यालाही अनेक खाचखळगे आले, मात्र त्यावरही त्यांनी मात करीत आपला समाजसेवेचा वसा असाच सुरू ठेवलाय. 


वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचं छप्पर हरपल्यानं संपूर्ण घराची जबाबदारी सुनिता ताई यांच्यावर आली. आई अपंग असल्याने ती मोलमजुरी किंवा दारोदारी जाऊन भिक मागू शकत नव्हती. मग अशावेळेस सुनिताताई वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून घराचा आधार बनल्या. मात्र दारोदारी फिरताना त्यांना आपल्या समाजातील लोकांवर होणारे अन्याय स्पष्ट दिसत होते. पोलीस विनाकारण पाल्यावर येऊन कोणालातरी चोरीच्या गुन्ह्यात अडकवायचे, मारझोड करायचे हे सुनिताताईंना सहन होईना. शाळेतही त्यांच्यावर वेगळं बसण्याची सक्ती होती. आई अपंग असली तरीही आपल्या लेकिनं खूप शिकावं असं त्यांना फार वाटे. म्हणून सुनिताताईंना त्यांनी शाळेत टाकलं. मात्र समाजातील चालीरितींना माणून शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून लांब बसवलं जायचं. पण त्या कोवळ्या वयात त्यांना या सामाजिक भेदभावाची कसलीच जाण नव्हती. पण आपल्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षाही वेगळं समजलं जातंय एवढं मात्र त्यांना कळायचं. शाळेत असतानाच त्यांच्या गावात एकदा मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्या या अभियानातून कार्यकर्त्यांनी समाजजागृतीचं काम केलं. या अभियानात कार्यकर्त्यांनी मानवी हक्क, अधिकार, कायदे यांविषयी माहिती दिली. तसेच, हे कार्यकर्ते नियमीत गावात येऊन समाज सुधारणेचं काम करत होते. पारधी समाजासाठी लढत होते, त्यांच्यासाठी आंदोलने, मोर्चे काढत होते. यातून सुनिता ताईंनाही हुरूप आला. आपल्या समाजाला जगण्याच्या मुळ प्रवाहात आणायचं असेल तर आपणही काहीतरी केलं पाहिजे या हेतुने त्यांनी मानवी हक्क अभियानात काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतलं. एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज कशी आणि कोठून आली असं विचारल्यावर त्या मिश्किलपणे म्हणाल्या, ‘जन्मल्यापासूनच आमच्या मागे विविध भोग लागलेले असतात, त्यामुळे शहाणपणही जरा लवकरच येतं. त्यातूनच मी या अभियानात सामिल झाले.’ 
मानवी हक्क अभियानात काम करताना पारधी समाजासाठी शासनाने केलेले कायदे, त्यांच्यासाठी असलेले हक्क, अधिकार यांविषयी सुनिताताईंना माहिती झाली. इयत्ता पाचवी शिकलेल्या सुनिताताईंना आता त्यांच्या विविध कायद्यांविषयी तोंडपाठ माहिती आहे. त्यानंतर त्यांना अ‍ॅड.एकनाथ आव्हाड यांनी स्वतःची एक संस्था स्थापन करण्याचा सल्ला सुनिताताईंना दिला. ही संस्था केवळ पारधी समाजाने पारधी समाजासाठी बनवलेली संस्था असेल. यासाठी त्यांनी ‘आदिवासी फासे पारधी समाज संघटना’ नावाची एक संस्था सन 2000च्या आसपास सुरू केली. या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांत काम सुरू झालं. या 11 जिल्ह्यांमध्ये पारधी समाजातील लोकांचे वास्तव्य आहे, तेथे जाऊन त्यांनी जनजागृतीचं काम केलं. एवढंच नव्हे तर अ‍ॅट्रोसिट कायद्याचे ज्ञान देणे, महिला सक्षमीकरण, जात पंचायत, शिक्षण, पोलिसांकडून होणारी छळवणूक आदी विषयांवर त्यांनी लोकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर या कोर्टकचेरीच्या प्ररकणांमध्ये वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे घालून समाजाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. 
आदिवासी फासे पारधी समाज संघटनेत काम केल्यानंतर त्यांनी आणखी एक संस्था स्थापन केली. समाजात क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘क्रांती’ नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेमार्फत त्यांनी पारधी समाजाच्या सुधारणेची कास धरली आहे. एवढंच नाहीतर मुलांनी शिकलं पाहिजे, तरुणांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे यासाठीही त्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाची दारंही उपलब्ध करून दिली आहे. ‘अ‍ॅड. उमा श्रीराम स्कॉलरशीप’ अंतर्गत 100 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. कारण मुलं शिकली तरच समाज पुढे जाईल असं त्यांना प्रकर्षानं वाटतं. 

सुनिताताई म्हणतात की या समाजाला फक्त बाहेरच्या समाजाकडून त्रास आहे असं नाही, तर अनेक अंतर्गत समस्याही आहेत. म्हणजे, हा समाज आजही वैचारिक पातळीवर मागासलेला असल्याने स्त्रीयांना आजही कमी लेखलं जातं. परंपरेने चालत आलेल्या अनेक अनिष्ट प्रथांचं पालन या समाजात केलं जात असल्याने महिलांना या प्रथांचा अतोनात त्रास होतो, असं सुनिताताई सांगतात. महिलांना या त्रासातून बाहेर काढण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबतच, स्त्री-पुरुष समानतेची जागृती या समाजात करायला हवी असं त्या म्हणतात. त्याचप्रमाणे सुनिताताई त्यादृष्टीने 'क्रांती'च्या माध्यमातून कामही करत आहेत. 
त्यांनी आजवर अनेक बालविवाहही थांबवले आहे. मुलींनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं सुनिताताईंना वाटतं. त्यासाठी त्या मुलींना शिक्षणासाठी नेहमीच उत्स्फूर्त करतात. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज या समाजातील अनेक मुली शिकल्या आहेत. इयत्ता पाचवी शिकलेल्या बाई जेव्हा शिक्षणाविषयी पोटतिडकीने बोलतात तेव्हा अप्रूप वाटतंच. मात्र परिस्थितीमुळे आपल्याला शालेय शिक्षण घेता आलं नसलं तरीही या अनुभवाच्या शाळेनं त्यांना भरपूर शिकवलं असं त्या आवर्जून सांगतात. 
सुनिताताई केवळ स्वतःच्या समाजातील लोकांसाठी काम करतात असंही नाही. समाजात जितके वंचित घटक आहेत, त्या प्रत्येकासाठी सुनिताताई तितक्याच पोटतिडकीने काम करतात. स्विस एड(पुणे), दलित फाऊंडेशन (नवी दिल्ली), पिपल्स वॉच (तामिल नाडू), माणुसकी सेंटर (पुणे), अलाईन्स फॉर दलित राईट्स (मुंबई) अशा विविध संघटनांसाठी सुुनिताताईंनी कामं केलेली आहेत. तसेच, या वंचित घटकांना केव्हाही कसलीही मदत लागली तर सुनिताताई सदैव तत्पर असतात. 
उदरनिर्वाहाचं साधनच सरकारने बंद केल्याने हा समाज गावोगावी जाऊन वेठबिगारीचं काम करतात. काम मिळेल तिथे पाला ठोकून तिथं स्थायिक होतात. इकडचं काम संपलं की आपलं बिर्‍हाड उचलायचं आणि दुसरीकडे पाला ठोकायचा. असंच गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्याने यांच्याकडे स्वतःचे ओळखपत्र नाही, निवडणूक पत्र नाही, रेशन कार्ड नाही. यांच्याकडून मतदान होत नसल्याने एकही राजकीय पक्ष यांच्यासाठी काम करत नाही. एवढंच नव्हे तर या समाजातून एकही राजकीय नेता पुढे आलेला नाही. त्यामुळे यांची प्रगती अद्यापही खुंटलेली आहे असं सुनिताताई सांगतात.
सुनिताताईंनी गेल्या वीस वर्षात नव्वदहून अधिक बालविवाह रोखले, 250हुन अधिक अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात ताईंनी मदत केली आहे, तसंच, त्यांनी 100 हून अधिक अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे, गरिबांना पोलिसांकडून होणारी छळवणुक रोखण्यासाठीही सुनिताताईंनी लढा दिला आहे. या आणि अशा अनेक घटनांत जिथे दुर्बल घटकांकडे तुच्छ लेखलं जातं तिथं सुनिताताईंनी नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पारधी समाजासाठी कार्य करणार्‍या त्या खर्‍या अर्थाने क्रांतीकारक आहेत. 

सुनिताताईंनी आजवर अनेक खस्ता खात समाजासाठी कार्य केले आहे. हा समाज पुढे यायचा असेल तर या समाजातील अनेक समस्या, प्रश्न पुढे यायला हवेत, यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. ‘विंचवाचं तेल’ असं या पुस्तकाचं नाव असून पुढील दोन महिन्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात त्यांनी या समाजातील राजकीय समस्या तर मांडल्याच आहेत, त्याचसोबत समाजातील अनेक अनिष्ट प्रथाही यात नमुद केल्या आहेत. 
सुनिता भोसले यांचे काम फार मोलाचे आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतलेली आहे. त्यांच्या संस्थांनाही अनेकांनी मदत केली आहे. तसंच त्यांना या कार्यासाठी आणखी बळ यावं याकरता त्यांचा विविध पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे. शहिद भगतसिंग, दिपस्तंब, सावित्री बाई संघर्श पुरस्कार, सावित्रीच्या लेकी अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुनिताताईंना नुकताच दैनिक महाराष्ट्र दिनमानतर्फे गौरवण्यात आलंय.

Comments

Popular Posts