Sabarimala Case : ही स्मृती की मनुस्मृती?


but no right to desecrate, Right to pray, t would you carry a napkin seeped with menstrual blood and walk into a friend’s house. You would not,

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आणि शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश या विषयांवर उधळलेल्या मुक्ताफळांवर सोशल मीडियावर चांगलीच झोड उठली आहे. समस्त महिला वर्गाने तर त्यांचा समाचार घेतलाच शिवाय पुरुषांनीही त्यांच्या विचारधारेची चांगलीच खिल्ली उडवली. रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन्स तुम्ही मित्र-मैत्रिणींच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत, मग मंदिरात नेण्याचा अट्टाहास का असा सवाल उपस्थित केल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. केंद्रात सत्ता गाजवणार्‍या महिलांकडूनच अशा बोजड आणि जुनाट विचारांची देवाणघेवाण होणार असेल तर तळागाळातील स्त्रियांनी या महिलांकडून कोणता आदर्श घ्यावा? मासिक पाळीच्या काळात पाळल्या जाणार्‍या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून देशपातळीवर विविध संघटना कार्य करत आहेत. समाजातील या वाईट रुढी मोडून काढण्यासाठी जनजागृती सुरू आहे. आता कुठे या जनजागृतीचा परिणाम सुशिक्षित समाजात दिसायला लागला असतानाच स्मृती इराणींचे हे वक्तव्य महिलांना पुन्हा जुन्या विचारांकडे घेऊन जाणारेच ठरेल. स्मृती इराणी या जरी राजकारणी म्हणून प्रसिद्ध असल्या तरीही आजही कित्येक महिला स्मृती इराणी यांना सोशिक आणि सांमजस्य भूमिका बजावणार्‍या अभिनेत्री म्हणूनच ओळखतात. ‘क्यों की सास भी कभी बहू थी’मधील तुलसी आजही महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील पात्रांसह सारे संवाद आजही कित्येक महिलांच्या तोंडपाठ आहेत. त्यामुळे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या स्मृती इराणी जर अशा जुनाट चालीरितींना धरून चालणार्‍या असतील तर या समाजातील इतर दीनदुबळ्या महिलांनी कोणाकडे पाहावे? ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या यंग थिंकर्स परिषदेत त्यांनी अशा प्रकारे खुलेपणाने वक्तव्ये केले. ज्याठिकाणी समस्त तरुण वर्ग त्यांना ऐकत असताना त्यांनी आपली जीभ सांभाळून आणि नव्या विचारांची कास धरून बोलणे गरजेचे होते, तेथेच त्यांनी अशाप्रकारच्या वक्तव्यांसाठी वाट मोकळी करून दिली. या परिषदेतील त्यांची दोन वाक्य अत्यंत चुकीची आणि अवैज्ञानिक आहेत हे कोणीही सुजाण नागरिक सहज सांगू शकेल. त्यांचे दुसरे वक्तव्य म्हणजे देवाचे दर्शन घेण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे, मात्र मंदिर अपवित्र करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. यावरून असे समजून येते की आजही त्यांच्या मनावर जुनाट विचारांचा पगडा आहे. एकविसाव्या शतकात, केंद्रात वस्त्रोद्योग मंत्री असणार्‍या स्मृती इराणीसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून जर अशा विचारांना खतपाणी मिळणार असेल तर आपला समाज पुढे जाण्याकरता आणखी किती वर्षे लागतील याची मोजमाप न केलेलीच बरी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, त्यांच्या या वक्तव्यांविरोधात सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स अशा विविध प्रसिद्धी माध्यमांकडून टिकेची झोड उठल्यावरही आमच्या केंद्रस्तरीय मंत्री गप्प बसल्या नाही. उलट गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे त्यांनी सोशल मीडियाचाच आधार घेत या टिकाकारांवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवर आपल्या तुलसी या पात्राचा फोटो पोस्ट करत त्याखाली ‘हम बोलेगे तो बोलेगा की बोलता है’ अशी उपरोधिक कॅप्शन टाकली. त्यांच्या या कॅप्शनवरून पुुन्हा एकदा त्या महिला वर्गासाठी टार्गेट ठरल्या. त्यांच्या या पोस्टवरही अनेकांनी टिका केली.शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरही अनेक धर्मांध लोकांनी याला कडवा विरोध केला आहे. मंदिर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालायचा निर्णय पायदळी तुडवत अद्यापही महिलांना प्रवेश दिलेला नाही. हा वाद संपण्याची चिन्ह फार कमी असताना त्यावर सरकारच्या प्रतिनिधींकडूनच मंदिर प्रशासनाची पाठराखण करणारी वक्तव्ये होणार असतील तर आपल्या भारत देशात सामाजिक क्रांती घडणार तरी कशी? स्मृती इराणींच्या या दोन्ही वक्तव्यांनंतर अनेक महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळा, महाविद्यालय हे सुद्धा विद्येचे मंदिर आहे. मग मासिक पाळीच्या काळात विद्येच्या मंदिरातही महिलांना जाणं वर्ज्य आहे का? रक्ताने माखलेले सॅनिटर नॅपकिन्स घेऊन आम्ही घरात वावरतो, ऑफिसात जातो, गर्दी-गोंगाटात प्रवास करतो, धावपळ, फिल्डवर्क करतो. मग असं असताना रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन्स आम्ही मंदिरात घेऊन गेलो तर बिघडलं कुठे? या प्रश्नांची उत्तरे स्मृती इराणी यांनी द्यावीत, एवढीच समस्त महिला वर्गाची अपेक्षा आहे.

Comments

Popular Posts