दिवाळीची ऑनलाईन शॉपिंग अाणि स्थानिक व्यापारांचे दिवाळे

online shopping, how to do online shopping, security for online shopping, online shopping sites in india, online shopping for men, online shopping fashion, online shopping sites for clothes
बंपर सेल, दिवाळी स्पेशल, इंडियाज मूड अशा विविध कॅची टॅगलाईनखाली सध्या ई-कॉमर्स क्षेत्राने आपला व्यवसाय वाढवला आहे. सण सुरू झाले की ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळांवरही भरघोस सुटचा पाऊस पडतो. या डिस्काऊंटला बळी पडत अनेक ग्राहक तेथून खरेदीही करतात. ब्रॅण्डेड वस्तू कमी किंमतीत मिळत असल्याने या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर तुफान गर्दी होते. दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर होत असलेल्या या करोडोंच्या उलाढालीचा फटका मात्र स्थानिक आणि लघू व्यापारांना बसला आहे. घरबसल्या शॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने ऐन दिवाळीच्या सणांत रस्त्यांवर म्हणावी तशी गर्दी झालेली दिसत नाही. छोटे मोठे दुकानदार, स्टॉलधारक येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडे आशेने पाहतात. दरवर्षी होणारी गर्दी यंदा होत नसल्याने त्यांच्या व्यवसायावरच कुर्‍हाड आली आहे. आजघडीला देशात सुमारे सात कोटींहून अधिक किरकोळ व्यापारी आहेत. यापैकी बहुतांश व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू विकतात. तर एक मोठा टक्का हा इलेक्ट्रॉनिक आणि कापड क्षेत्राशी संबंधित आहे. या व्यापार्‍यांच्या दृष्टीने रक्षाबंधन ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा आणि तेथून पुढे उन्हाळ्यातील लग्नसराईचा मौसम व्यापारासाठी अनुकूल समजला जातो. पण, ऑनलाइन कंपन्यांमुळे ऐन मौसमातदेखील व्यापाराने गती पकडली नसल्याचे सांगण्यात येते. स्थानिक व्यापारांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरता मध्यंतरी सोशल मीडियावर एक संदेश प्रचंड व्हायरल झाला होता. विदेशी कंपन्यांकडून खरेदी करून भारतातला पैसा परदेशी पाठवण्यापेक्षा स्थानिक व्यापारांकडूनच खरेदीकरण्याचं आवाहन या व्हायरल मॅसेजमधून करण्यात आले होते. कित्येक सजग, सुजाण नागरिकांनी हा मॅसेज फॉरवर्डही केला. मात्र तरीही ऑनलाईन शॉपिंगचा पगडा समाजमनातून कमी झालेला दिसत नाही. हल्ली कपड्यांपासून ते अगदी घरातील वाणसामानापर्यंत सारंकाही ऑनलाईन उपलब्ध आहे. एका क्लिकवर या वस्तू घरपोच होतात, अगदी कमी किंमतीत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट काढत, गर्दीत स्वतःला हरवून घेत खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या एका क्लिकवर शॉपिंग करण्याचा ट्रेंड रुजू झाला. मात्र हा ट्रेंड काही पारंपरिक व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांच्याच मुळावरच आला आहे. ऐन दिवाळीत त्यांची दिवाळं निघण्याची वेळ आली आहे. येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडे आशेने पाहत त्यांना दुकानातील विविध ऑफर्सविषयी माहिती देण्याचा केविलवाना प्रयत्न या व्यापारांकडून होतो. मात्र त्यांच्या या विणवलिला ग्राहकांकडून अजिबात भिक घातली जात नाही. सणांच्या काळात करोडोंची उलाढाल करणार्‍या उल्हासनगरातील व्यापारी डोक्यावर हात लाऊन बसले आहेत. रस्त्यांवर पसरलेला शुकशुकाट डिजिटल क्रांतीची जाणीव करून देत असला तरीही ही क्रांती मात्र लहान व्यापारांसाठी दिवाळखोरीच ठरली आहे. हाच उरला सुरला व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ येऊ नये याकरता उल्हासनगरातील व्यापारांनी एकत्र येत चाणक्यनिती आखली. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून वस्तू खरेदी करायच्या. खरेदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय वापरायचा. वस्तूची डिलिव्हरी आल्यावर ती डिलिव्हरी नाकारायची. माल सतत परत गेल्याने त्या पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय बंद करण्यात येतो. ही शक्कल उल्हासनगरातील अनेक व्यापारांनी वापरली. परिणामी या ई-कॉमर्स संकेतस्थळांनी उल्हासनगरातील पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्यायच बंद करण्यात आला. कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायामुळेच ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे तो पर्यायच बंद करण्याची नामी शक्कल उल्हासनगरातील व्यापारांनी वापरल्याने त्यांचा धंदा आता तरी तेजीत येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. उद्योगांचे माहेरघर असणार्‍या उल्हासनगरमध्ये ही अवस्था असेल तर इतर शहरांचा विचारच न केलेला बरा. कारण ठाणे, मुंबईत शहरातही हीच परिस्थिती आहे. ठाण्यातील राम मारूती रोड छोट्या मोठ्या व्यापारांनी गजबजलेला आहे. दोन वर्षांपूर्वी येथे ज्याप्रमाणात खरेदीसाठी गर्दी उसळायची त्यामानाने यंदा गर्दी कमी झाल्याचे व्यापारी सांगतात. मुख्यत्वे कपडा बाजार थंड झाल्याने येथील अनेक कामगारांवर नोकरीची कुर्‍हाड आली. कित्येक कामगार बेरोजगार झाले. ज्या दुकानात पूर्वी 7 ते 8 मजूर काम करायचे, त्याच दुकानात 4 कामगारांना पगार देणेही कठीण बनल्याचे दुकानमालक सांगतात. काही दुकानांमध्ये तीन हप्त्यांत पगार दिला जातो आहे. तर काहींचे पगार थकल्याचे अनेक कामगार सांगतात. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमुळे एक लाखभर तरुणांना नोकर्‍या लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. देशभरात 1 लाख तरुणांना नोकर्‍या लागत असताना प्रत्येक गल्लीबोळातून हजारो कामगार बेरोजगार होत असल्याने ऑनलाईन शॉपिंगमुळे भारताला नक्की काय साधले हाच संशोधनाचा विषय ठरणार आहे.
---
Tags : online shopping, how to do online shopping, security for online shopping, online shopping sites in india, online shopping for men, online shopping fashion, online shopping sites for clothes

Comments

Popular Posts