Celebrity Interview : खलनायिका साकारणं आव्हानात्मक




मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनय, नृत्याची झलक दाखवणार्‍या किशोरी शहाणे वीज यांचा आणखी एक नवा कोरा चित्रपट नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील एका गँगस्टरवर आधारित असलेला ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटात किशोरी शहाणे पहिल्यांदाच प्रेक्षकांना खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. विनोदी, सोशिक भूमिका साकारणार्‍या किशोर शहाणे यांच्या वाट्याला आलेली खलनायिकेची ही भूमिक खरोखरच वेगळी आणि सक्षम आहे, असे त्या सांगतात. त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी मारलेल्या दिलखुलास गप्पा.
नव्या वर्षातील नवा सिनेमा, किती उत्सूक आहात?
* नेहमीप्रमाणेच प्रचंड उत्सूक आहे. येत्या 11 जानेवारीला सिनेमा प्रदर्शित होतोय हेही मला काही दिवसांपूर्वीच कळलं. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात एकदम भन्नाट झालीय.

तुम्ही आजवर विविध भूमिका साकारल्या, या चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगाल?
* या चित्रपटातून प्रेक्षकांना माझ्यातील खलनायिका पाहायला मिळणार आहे. मी आजवर खलनायिकेची भूमिका साकारली नव्हती. मात्र या चित्रपटामुळे तीसुद्धा कसर भरून निघाली. एका करारी मुख्यमंत्र्याची भूमिका मी या चित्रपटातून साकारत आहे.

पहिल्यांदाच खलनायिका साकारताना किती दडपण होतं?
* या भूमिकेसाठी रिमा लागू यांना विचारण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर निर्मात्यांनी माझ्याकडे विचारणा केली. मनात थोडीशी साशंक होते. पण ज्या भूमिकेसाठी रिमाताईंचं नाव घेतलं गेलं ती भूमिका माझ्या वाट्याला आल्याने मी ही भूमिका स्विकारण्याचा विचार केला. हा चित्रपट वास्तवदर्शी असला तरी त्याला काल्पनिक जोडही आहे. त्याचप्रमाणे माझी भूमिकाही अशीच काल्पनिक होती. त्यामुळे मला माझं असं कॅरेक्टर निर्माण करायला वाव मिळाला. शिवाय दिग्दर्शकाने मला माझ्या कॅरेक्टरचं डेफिनेशन दिलं होतं त्यामुळे मला ती भूमिका खुलवताना सोपं गेलं. हे एक आव्हान होतं पण अभ्यासपूर्ण हे आव्हान मी पेललं.

या चित्रपटात मुंबईचं विश्व दिसणार आहे, तुमच्यासाठी मुंबई काय आहे?
* माझा जन्म पुण्यात झाला. पण कर्मभूमी म्हणून मुंबईने मला खूप काही दिलं. मुंबई व्यतिरिक्त इतर कुठेही जाण्याचा मी विचारही करू शकत नाही. जो मुंबईला आपलंसं करतो त्याला मुंबईही आपलंसं करते. या शहरात मेहनतीची कदर केली जाते. त्यामुळे मेहनत करणारा कधीच उपाशी झोपत नाही. शिवाय या चित्रपटातून 1993 सालचं मुंबईचं चित्रं दिसणार आहे. त्या काळातील मुंबईवर गँगस्टरचं कसं वर्चस्व होतं याचं चपखल वर्णन चित्रपटातून केलंय. त्यामुळे तो काळ मला पुन्हा अनुभवता आला.

राकेश बापट, इक्बाल खानसारख्या तरुण कलाकारांसोबतचा अनुभव कसा होता?
* राकेश बापटचा अभिनय अगदी सहज आहे. एखाद-दुसर्‍या प्रॅक्टिसनंतर आम्ही डायरेक्ट सिन शूट करायचो. त्याच्यातील सहजतेमुळे मी त्याच्यासोबत पटकन कनेक्ट झाले. त्यामुळे सिन्स अधिक खुलत गेले. इक्बाल खानसोबत माझे सिन्स नाहीत. त्यामुळे त्याच्यासोबतचा अनुभव नाही.

चित्रपटसृष्टीतील एक अख्खी पिढी तुम्ही अनुभवली आहे, बदलत गेलेल्या मराठी चित्रपटांविषयी काय सांगाल?
* पूर्वी चित्रपटांमध्ये एका विषयाची लाट यायची. एखादा विषय प्रेक्षकांना आवडला की त्यालाच अनुसरून चित्रपट निर्मिती व्हायची. मात्र हल्ली वेगवेगळ्या जॉनरमध्ये चित्रपट येतात. वेगवेगळे विषय मराठी चित्रपटांतून सक्षमपणे मांडण्यात आलेत. हा सगळा बदल याची देही याची डोळा मला अनुभवता आला. प्रत्येक बदलाचा मी भाग झाले याचा मला आनंद आहे.

नव्या वर्षातील संकल्प आणि नवे प्रोजेक्ट कोणते?
* अधिकाधिक फिट राहण्याचा, महिलांना सक्षम करण्याचा, स्वतःला आणखी सिद्ध करण्याचा माझा यंदाचा संकल्प आहे. शिवाय येत्या वर्षात दोन-तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. पियानो फॉर सेल या नाटकाचे प्रयोगही जोरात सुरू आहेत. शिवाय वेब सिरिजीचीही कामं सुरू असतात. त्यामुळे हे वर्ष एकंदरीतच थोडंसं बिझी जाईल, पण मजा येईल एवढं नक्की.

Comments

Popular Posts