सुशिक्षित अडाण्यांच्या देशात


women empowerment, women equality, sabrimala case, sabrimala temple, periods, virginity test
विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नितीविना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या शेतकर्‍यांचा आसूड या ग्रंथात लिहिलेल्या या ओळी. तत्कालिन सामाजिक मागसलेपणाचे कारण हे अविद्या असल्याचे या ओळींतून त्यांनी स्पष्ट केलं. लोकमानसात अज्ञान अधिक असल्याने रुढी परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथांना खतपणी मिळत होतं. मात्र ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील या कुप्रथांविरोधात बंड केले, जनमानसात जनजागृती केली आणि एकोणविसाव्या शतकात सामाजिक परिवर्तन घडवून आणले. पण अशा लोकोत्तर व्यक्तीमत्वांच्या क्रांतीकारी कार्याचा वारसा सांगणाऱ्या आपल्या समाजात कित्येक अनिष्ट प्रथा आजही पाय रोवून घट्ट आहेत. परंपरा, रुढींच्या नावाखाली असलेल्या प्रथांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्या सर्वांना एकविसाव्या शतकातही चळवळ उभी करावी लागत आहे, संघर्ष संपलेला नाही. सनातनी, सरंजामी वृत्तीच्या व्यक्तींच्या विरोधात महिलांना आजही स्वतःचे हक्क सिद्ध करण्यासाठी झगडावं लागत आहे. शबरीमाला मंदिरातील वादही त्यातीलच एक. शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी कायदेशीर परवानगी असतानाही महिलांना त्यांच्या अधिकारांपासून डावललं जात आहे. त्यासाठी महिला साखळी, महिला भिंत उभारून स्वतःच्या हक्कांसाठी लढा द्यावा लागतो आहे. हा लढा पुरता हाणून पाडण्यासाठी धर्मवेड्या उजव्या संघटनांकडून हिंसा घडवली जाते. ज्याप्रमाणे सावित्रीबाईंवर तत्कालिन सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी चिखलफेक केली त्याचप्रमाणे आजच्या सावित्रीलाही विचलित करण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. बुधवारी पहाटे दोन महिलांनी या रुढी, परंपरांना फाटा देत शबरीमाला मंदिरात इतिहास घडवला. ज्या देवाने कित्येक शतकात महिलांना दर्शन दिलं नव्हतं त्याच मंदिरात महिलांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात दर्शन घेतलं. ही बाब बाहेर समजल्यावर धार्मिक माथेफिरुंचा राग अनावर झाला. संपूर्ण केरळ बंद करण्यात आलं. एवढेच नव्हे तर मंदिर शुद्धीकरणासाठी मंदिर दोन तास बंद ठेवण्यात आलं. मंदिर प्रवेशासाठी झगडा करणार्‍या महिलांविरोधात हिंसाचार घडवून आणला गेला. त्यात एकाचा मृत्यूही झाला. भाजपा, काँग्रेस, रा.स्व.संघ यांचा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असलेला कडवा विरोधच यातून स्पष्ट झाला आहे. ज्यांच्यावर समाजात सलोखा, समानता राखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून नियमांची, अधिकारांची पायमल्ली होत असल्याने सामाजिक वातावरण आणखी ढवळून निघत आहे. शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत केरळमधल्याच नव्हे तर देशभरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांच्यामते सर्वोच्च न्यायालयाने परंपरावर देखरेख करणं चुकीचं आहे. याच विषयावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उधळलेली मुक्ताफळेही सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यामुळे एकविसाव्या शतकातही महिला रुढींच्या बंधनात जखडल्या असल्याची खंत नक्कीच सावित्रीमाईंना वाटली असती.
women empowerment, women equality, sabrimala case, sabrimala temple, periods, virginity test
 
महिलांना समानतेची वागणूक देताना कुचराई करणार्‍या समाजात त्यांच्या चारित्र्याच्या परिक्षा घेण्याच्याही कुप्रथा सुरू आहेत. बीडमध्ये कंजारभाट समाजातील उच्चशिक्षित वराने केलेली वधूची कौमार्य चाचणीही त्यातीलच एक. हा नवरोबा पुण्यातील माजी नगरसेवकाचा मुलगा. त्याचा सासरा म्हणजे मुलीचे वडील पोलीस अधिकारी. या सगळ्यांनी मिळून या मुलीची अशी मानहानी केली आणि कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला. राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कृष्णा इंद्रेकर यांच्यामुळे हा प्रकार समाजमाध्यमात चर्चेला आला. लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीला तिचं कौमार्य सिद्ध करता नाही आले तर कंजारभाटांची जातपंचायत शिक्षा ठोठावते, दंड वसूल करते. दंड मिळाला की या जातपंचायतीला आणि मुलाकडच्यानाही सगळे मान्य होते म्हणे. या असल्या प्रथेविरोधात पुण्यापासून महाराष्ट्रातील अनेक काना-कोपर्‍यातून तरुणांनी बंड सुरू केले आहे. जातपंचायत संस्था बरखास्त होऊन कित्येक वर्ष लोटली असली तरीही छुप्यापद्धतीने अशा जातपंचायतींची दहशत आजही कायम असल्याचे या तरुणांनी उजेडात आणलं. या जातपंचायती हाणून पाडण्यासाठी त्यांनी चळवळी उभ्या केल्या. पण जातपंचायतीला उच्चशिक्षित तरुणच बळी पडून आपल्याच पत्नीची अशी सार्वजनिक मानहानी करत असतील तर ते संतापजनक आहे. ज्या काळात मुलीला उंबरठ्याबाहेर पडणंही मुश्किल होतं त्या काळात सावित्रीबाई घराबाहेर पडल्या. स्त्री उद्धारासाठी त्यांनी संघर्ष केला. महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याच सावित्रीबाईंच्या राज्यात महिलांना कौमार्य चाचणी करावी लागणं हे पुरोगामी समजल्या जाणार्‍या आपल्या राज्याला लांच्छनास्पद आहे. दोन दिवसांपूर्वी चैत्यभूमी ते शिवाजी पार्कपर्यंत एक भलामोठी महिला साखळी तयार झाली होती. महिलांवर होणार्‍या विविध अन्यायाविरोधात एकत्र लढा देण्यासाठी ही साखळी तयार करण्यात आली होती. या साखळीत बुरखा घातलेल्या महिलांपासून ते तान्ह्या पोरा-बाळांसकट अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. एकमेकींचे हात हातात धरून आपण सार्‍याजणी एकमेकींना साथ देऊन समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात, धारणांविरोधात अधिक व्यापक आंदोलन पुकारू असे आश्वासन दिले. सुशिक्षितांच्या अडाणीपणाला रोखण्यासाठी अशाच एकजुटीची गरज आहे.
 
दैनिक महाराष्ट्र दिनमान
Tags-women empowerment, women equality, sabrimala case, sabrimala temple, periods, virginity test

Comments

Popular Posts