Film Review : हृदय हेलावणारा "एक निर्णय"


film review, marathi film review, subodh bhave, kunjika kalvint, new actress, new marathi actress, shrirang deshmukh,


आपल्या आयुष्यात आपलं ध्येय गाठण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयावर ठाम राहून आपल्याला अत्युच्च मजल मारावी लागते. मात्र यशाच्या एका वळणावर असताना अचानक ठेच लागते आणि घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला पुनर्विचार करावा लागतो. नेमका हाच धागा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या सिनेमात लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता श्रीरंग देशमुख यांनी पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘एक निर्णय...’ हा चित्रपट बालरोगतज्ज्ञ डॉ. इशान (सुबोध भावे), हृदयरोग तज्ज्ञ डॉ.मुक्ता (मधुरा वेलणकर) आणि मानसी (कुजिंका काळविंट) या तिघांमध्ये गुंफलेली आहे. डॉ.इशान आणि मानसी हे नात्याने नवराबायको. त्यांचं नुकतंच लग्न झालेलं असतं. नव्या लग्नाची नवलाई मानसी आणि डॉ. इशान अनुभवतात. त्यात त्यांना मुलाची चाहूल लागते. मातृत्वाची जाणीव झाल्याने मानसीसह संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. मात्र काही दिवसांनंतर मानसीचं पोटातलं बाळ दगावतं. त्यानंतर ती पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही असा वैद्यकीय अहवाल येतो. यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखी होतं. दुसरीकडे डॉ. मुक्ताची वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती उंचावत जात असते. यशाचे अनेक शिखरं ती पार करत असते. अशातच तिला परदेशात फेलोशिपसाठी बोलावणं येतं. यासाठी ती आपल्या आई-बाबांनीही परदेशात येण्याची विनंती करते. मात्र ते परदेशात जाण्याआधीच आई-बाबांचा अपघात होऊन त्यांचं निधन होतं. या घटनेमुळे मुक्ता प्रचंड एकटी पडते. गेली कित्येक वर्षे त्रिकोणी कुटुंबात राहिलेली मुक्ता एकाकी होते. वैद्यकीय क्षेत्रातही तिचं मन रमत नाही. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्यासाठी तिने आजवर अनेक कठोर निर्णय घेतलेले असतात. ध्येयप्राप्तीसाठी ती प्रसंगी आपल्या जीवनसाथीशीही साथ सोडते. मात्र आई-वडिलांच्या निधनामुळे ती एकटी पडते. ध्येयाच्या मागे लागताना आपण आधी माणूस आहोत, आपल्यालाही कोणामध्ये तरी गुंतणं गरजेचं असतं याची जाणीव मुक्ताला होते. आपल्या आयुष्यातील ही पोकळी भरून काढण्यासाठी, एकाकीपण घालवण्यासाठी ती बाळाला जन्म देण्याचा विचार करते. यासाठी तिला स्पर्म डोनेटरची गरज लागते. डॉ.इशानकडे ती स्पर्म डोनेट करण्याची मागणी करते. स्पर्म डोनेटची मागणी ती डॉ.इशानकडेच का करते? मुक्ता आणि इशानचं नातं काय? कथा या वळणावर आल्यानंतर मानसी कोणता निर्णय घेते याची उत्तरं चित्रपटात चपखलपणे दिली आहेत.
film review, marathi film review, subodh bhave, kunjika kalvint, new actress, new marathi actress, shrirang deshmukh,
अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीरंग देशमुख हे पहिल्यांदाच निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात उतरले आहेत. शिवाय इशानच्या मोठ्या भावाचीही भूमिका त्यांनी साकारली आहे. एकाच सिनेमातून अशी चौफेर भूमिका साकारतानाही श्रीरंग देशमुख यांनी संपूर्ण सिनेमा योग्यपणे जूळवून आणला आहे. मध्यंतरापूर्वी थोडासा रेंगाळणारा हा चित्रपट उत्तरार्धात योग्य पकड घेतो. चित्रपटातील काही वाक्य मनाचा ठाव घेतात. लग्नसंस्था म्हणजे काय? याचं योग्य उत्तर या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. विक्रम गोखले, सुहास जोशी, शरद पोेंक्षे, सीमा देशमुख, मुग्धा गोडबोल यांनी अत्यंत सहज आणि सुंदर अभिनय केल्याने चित्रपट छान खुलत जातो. विक्रम गोखले यांनी साकारलेली वडिलांची भूमिका प्रेक्षकांना अंतर्मुख करते. छायांकनाची बाजूही सक्षम आहे. गाणीही उत्तम जमून आली आहेत. एकंदरीत फॅमिली ड्रामा प्रकारामध्ये बांधलेला हा चित्रपट आजच्या काळाला सुसंगत असा ठरला आहे.
दैनिक महाराष्ट्र दिनमान



Tags-film review, marathi film review, subodh bhave, kunjika kalvint, new actress, new marathi actress, shrirang deshmukh, 

Comments

Popular Posts