बोलीभाषा जगवा, संस्कृती टिकवा

boli bhasha, mother tongue, matrubhasha, marathi language, international mother tongue day


सर्वाधिक बोलीभाषा बोलणार्‍या देशांमध्ये भारत हा देश सर्वांत बोलीभाषासमृद्ध मानला जातो. आपल्या महाराष्ट्राची तर सर्वाधिक बोलीभाषा बोलणारा प्रदेश अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख आजही आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भारतातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषांवर जागतिकीकरणाची कुऱ्हाड पडली. आकडेवारीतच सांगायचे झाले तर भारतात 19 हजार 569 बोली भाषा अस्तित्वात होत्या असं भाषावैज्ञानिक सांगतात. मात्र काळाच्या ओघात या भाषा लुप्त होत गेल्या. भाषावैज्ञानिक डॉ.गणेश देवी यांनी केलेल्या अभ्यासानुसार सध्याच्या घडीला 40 बोली भाषा मृतावस्थेत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी आपण जागतिक मातृभाषा दिन साजरा केला. मात्र मातृभाषा दिन साजरा करताना मराठीच्या मायभगिनी असलेल्या बोलीभाषा नष्ट होतील की काय अशी भिती वाटू लागते. जे राज्याचे तेच देशातील बोलीभाषांचे. 1961 च्या जणगणनेनुसार भारतात 1652 बोलीभाषा बोलल्या जात होत्या. मात्र द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने 2010 साली केलेल्या सर्वेक्षणात केवळ 780 बोली भाषा शिल्लक राहिल्या. तर, याच सर्वेक्षणातून असंही सिद्ध झालं होतं की 197 भाषांचं अस्तित्व धोक्यात असून 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भाषा बोलण्यात राहिली नाही तर ती नष्ट होते हे जगजाहीर आहे. त्यामुळे भाषेचा वापर सुरू राहणं गरजेचं आहे. मात्र प्रमाण भाषेचं वाढलेलं वर्चस्व आणि शिक्षणात झालेली क्रांती यांनी बोलीभाषांना नख लावले आहे. बोलीभाषांना स्वतःचं असं एक वेगळं व्याकरण असतं. प्रत्येक बोलीचा वेगळा लहेजा, टोन, उच्चारण असतात. या बोलीभाषा आत्मसात करायला बराच वेळ लागतो. मुळात या भाषा शिकल्या तरी त्यांचा लहेजा आपल्यात मुरत नाही. कारण बोली भाषांचे संस्कार मुळातूनच जीभेवर रोवले गेले पाहिजे. जन्मापासूनच बोली भाषांचे उच्चार आपल्या कानावर पडले गेले पाहिजेत. तरच त्यांचा आस्वाद घेता येतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रमाण भाषेला अधिक महत्त्व आले आणि त्यातही इंग्रजी भाषेलाच सर्वस्व मानल्याने बोली भाषांचा अस्सल मातीचा गंध हरवत गेला.
boli bhasha, mother tongue, matrubhasha, marathi language, international mother tongue day
आधुनिक जीवनशैलीला सामोरे जाताना आपापल्या बोलीचे स्वत्व व सौंदर्य टिकविण्याची आकांक्षा या छोट्या छोट्या समुदायांमध्ये कशी पेरायची, हा खरा प्रश्न आहे. बोली भाषांचं जतन करण्याचं दुसरं साधन म्हणजे साहित्य. आज अनेक बोली भाषांचं केवळ मौखिक साहित्य उपलब्ध आहे. लोकसाहित्य, लोककलांमधून बोली भाषांचा प्रचार-प्रसार होत राहतो. मुळातच प्रत्येक बोलीची एक कला असते. त्यातूनच लोककलांचा उगम होतो. मात्र लोककलांना असलेली मागणी कमी होत गेल्याने बोलीभाषांचाही प्रसार कमी झाला. मालवणी, कोकणी, अहिराणी, गोंड, भिली, कोरकू या बोलीभाषांचे लिखित साहित्य उपलब्ध आहे. मात्र यापलिकडे देशभरातील स्थानिक बोलीभाषांचे साहित्य उपलब्ध नसल्याने या बोलीभाषा पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवणं कठीण होऊन बसलंय. ‘भाषा नष्ट होणं ही सांस्कृतिक हानी आहे. भाषा लुप्त होण्यानं दंतकथा, खेळ, संगीत, खाण्यापिण्याच्या पद्धती असं सगळंच रसातळाला जातं, असं भाषावैज्ञानिक डॉ.गणेश देवी सांगतात. त्यामुळे एक बोली भाषा नष्ट झाल्याने संपूर्ण संस्कृती नष्ट होते हे लक्षात घ्यायला हवे. विदर्भातील भामरागड तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मुलं शिकण्यासाठी नाक मुरडत होती. शाळेत असलेली मराठी प्रमाण भाषा त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. ही गोष्ट येथील शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांच्या भाषेत शिक्षण देण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले. शेवटी बालभारतीने अशा आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तेथील स्थानिक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. बालभारतीचा हा निर्णय़ क्रांतीकारक ठऱली आहे. आदिवासी विद्यार्थी पुन्हा शाळेकडे परतले. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील 11 तालुक्यांमध्ये असा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणतीही भाषा जिवंत ठेवायची असेल तर त्या भाषेचा शिक्षणात किती वापर आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षणात प्रमाण भाषेसोबतच बोली भाषांचाही वापर वाढल्यास लयाला जाणार्‍या या भाषा पुन्हा कात टाकतील. प्रत्येक बोली रसाळ असल्याने, बोलीची संस्कृती रंजक असल्याने या बोलींचा अभ्यास आता सुरू आहे. लोकसाहित्य, दलित साहित्य, नागरी साहित्यांसोबतच बोलीभाषेतील साहित्य, बोली भाषांचा अभ्यास सध्या सुरू आहे. आगरी, मालवणी, कोकणी, अहिराणी भाषेचा अभ्यास सुरू आहे. यातूनच कोकणी मुस्लिम बोली थेट द. आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पोहोचली असल्याचे पुढे आले आहे. मात्र हे काही मोजके अपवाद सोडता अनेक बोली भाषांचा अभ्यास करायचा ठरवला तरी संदर्भ सापडणे कठीण आहे. त्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. बोली भाषांचे जतन, संवर्धन करण्यासाठी आता जर पावले उचलली नाही तर अस्तित्वात असलेल्या बोली भाषाही संपतील. अनेक भाषावैज्ञानिक बोली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या अभ्यासाला, त्यांच्या संशोधनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिल्यास उरलेल्या भाषा जगवण्यासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मदत होईल.

boli bhasha, mother tongue, matrubhasha, marathi language, international mother tongue day







boli bhasha, mother tongue, matrubhasha, marathi language, international mother tongue day
दैनिक महाराष्ट्र दिनमान

Tags - boli bhasha, mother tongue, matrubhasha, marathi language, international mother tongue day



Comments

  1. बोलीभाषा टीकवण्यासाठी फक्त बालभारती किंवा सरकारवर अवलंबून राहून चालणारच नाही. त्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेणेही तितकेच गरजेचे आहे. ही जबाबदारी पेलणं काही कठीण नाही. पण त्यासाठी अनेक जण पुढे यायला हवेत. आज साहित्य म्हणा किंवा कलाक्षेत्रात म्हणा बोलीभाषांचा वावर अतिशय मर्यादित झाला आहे. तो जर वाढीस लागला, तर निदान या बोलीभाषा पुढे येण्यास मदत होईल....

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts