जोश आणि होश सांभाळण्याची गरज

war on social media, India-Pakistan tension, pulwama attack, balkot attack, abhinandan, ninad mandgavane, vijeti mandgavane

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवर सहजच फेरफटका मारला तरी देशात सध्या किती युद्धज्वर पसरलंय याची प्रचिती येते. त्यातच शहीद निनाद मांडगवणे यांच्या पत्नीने सोशलवीरांना लावलेली शाब्दिक चपराक अगदी योग्य आणि चपखल वाटते. ‘सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणार्‍यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा’, असं भावनिक आवाहन या ताईंनी केलं आहे. यावरून तरी आपण किती दुर्बुद्धीने विचार करतोय याची खात्री होईल. सध्याची परिस्थिती ही फार भयानक आहे. ज्यांच्या घरातील भाऊ, वडिल, मुलगा सैन्यात आहे त्या घरातील एकही व्यक्ती मिनिटभरही बातम्यांसमोरून हलत नसणार. एवढंच कशाला एखादा फोन खणाणला तरीही त्यांच्या जीवाचं पाणी होत असणार. असं असतानाही, युद्धभूमीवर चाललेल्या कारवायांची माहिती नसतानाही सोशल मीडियावर युद्धाच्या वल्गना करणं, युद्ध व्हावं अशी ओरड करणं, बदला घेण्याची चिथावणी देणं, लोकांची माथी भडकवणं किती योग्य आहे? दोन्ही देशांमध्ये प्रचंड द्वंद्व सुरू आहे. अशावेळेस आपण भारतीय म्हणून कसे वागायला हवे याचे भान आपणच ठेवायला हवे ना. देशावर आलेली ही आपबिती पाहता आपलं देशप्रेम उफाळून येणं हे स्वाभाविक आहे. त्यातून येणारी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही आपण समजू शकतो. मात्र या प्रतिक्रियांनाही मर्यादा हव्यात. केवळ सोशल मीडियावर फुशारक्या मारल्याने आपण आपली बुद्धिमत्ता सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी आपला विवेकही जागा ठेवावा लागेल. भारतीय वायूसेनेने दहशतवादी तळांवर जेव्हा बॉम्ब हल्ला केला तेव्हा भारतीयांनी सर्वत्र जल्लोष केला.
Tags- war on social media, India-Pakistan tension, pulwama attack, balkot attack, abhinandan, ninad mandgavane, vijeti mandgavane

सोशल मीडियावरही या प्रत्युत्तराचं कौतुक करण्यात आलं. मात्र आपला आनंद साजरा करतानाच सोशल मीडियावर असंख्य चुकीचे व्हिडिओ व्हायरल झाले. एका व्हिडिओ गेममध्ये वापरला गेलेला व्हिडिओही या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ असल्याचं सांगून व्हायरल झाला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही कसलीही खातरजमा न करता हा व्हिडिओ चॅनेलवर दाखवला. मात्र जेव्हा या व्हिडिओमागची सत्यता कळली तेव्हा सर्वांचीच तोंडे आपसुकच बंद झाली. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी मीडियानेही भारतीयांच्या या कृत्याचे धिंडवडे काढले. एकाबाजुला रणांगणात आपले सुपुत्र शत्रुंच्या कारवाया परतवून लावण्यासाठी जीवापाड धडपड करताहेत आणि दुसरीकडे आपण कसलाही विचार न करता लोकांसमोर आपलं हसे करून घेत आहोत. त्यामुळे सैन्यदलाशी संबंधित असलेली कोणतीही बातमी पुढे पाठवताना निदान दोनवेळा तरी विचार करायला हवा. गल्लीतल्या नगरसेवकासमोर उभं राहण्याची ज्याची पात्रता नाही तो आज उठून देशाच्या सैन्य दलांच्या अधिकार्‍यांना थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून युद्ध करण्याचं आवाहन करतोय. आपलं मत, आपले विचार मांडायचे अधिकार प्रत्येकाला आहेतच, पण कोणत्या विषयांत आपण आपली मते मांडली पाहिजेत याचाही विचार करायला हवा. एका बंद खोलीत अत्यंत सुरक्षित वातावरणात बसून लॅपटॉप, मोबाईलवर किबोर्ड खडखडले म्हणजे युद्ध होत नसतं. त्यासाठी प्रत्यक्ष युद्धीभूमीवर जाऊन समोरचं वातावरण अनुभवावं लागतं. त्यासाठी निनाद मांडगवणे यांची पत्नी विजेती मांडगवणे यांनी सोशलवीरांना घातलेली साद महत्त्वाची वाटते. खरेच आपल्याला देशाची, देशातील सैनिकांची, देशांतील प्रश्नांची काळजी असेल तर हातातील मोबाईल सोडा आणि थेट सैन्यात सामील व्हा. उद्या युद्ध होईल अथवा न होईल. युद्ध व्हावं की न व्हावं हे ठरवण्यासाठी आपले सैन्यदल सक्षम आहेतच. दोन्ही देशांत शांतता कशी नांदेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यात देशहित असेल तोच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियावर सुरू केलेले युद्ध त्वरीत थांबवायला हवे. प्रत्येकाची मते वेगवेगळी असतात. त्यातून मतांतरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपपासांतच क्लेश निर्माण होतील. सध्या देशाला एकजुटीची गरज आहे. आपल्या एकजुटीतूनच  विजय शक्य आहे. म्हणूनच आपली मते मांडण्याआधी, युद्धाच्या वल्गना करण्याआधी आपल्या सैन्यदलावर विश्वास ठेवा. प्रत्यक्ष सीमेवर जाऊनच युद्ध लढवून आपलं देशप्रेम दाखवायचीही गरज नाही. बसल्या घरातूनही आपण आपलं देशप्रेम सिद्ध करू शकतो. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी काही केले तरी ते राष्ट्रप्रेमच ठरणार आहे. आजुबाजूला घडणार्‍या परिस्थितीचा कानोसा घेत सतर्क राहणे, सोशल मीडियावर काहीही फॉरवर्ड करताना दहावेळा विचार करणे, सैन्यदलाशी संदर्भातील कोणत्याही गोष्टी फॉरवर्ड न करणे, कोणत्याही कारवाईचे फोटो-व्हिडिओ शेअर न करणे, रक्ताळलेल्या सैनिकांचे फोटोही तात्काळ डिलिट मारणे आणि सजग- सतर्क राहणं हीच सध्या आपली देशभक्ती आहे.
Tags- war on social media, India-Pakistan tension, pulwama attack, balkot attack, abhinandan, ninad mandgavane, vijeti mandgavane
दैनिक महाराष्ट्र दिनमान

---
Tags- war on social media, India-Pakistan tension, pulwama attack, balkot attack, abhinandan, ninad mandgavane, vijeti mandgavane

Comments

Popular Posts