पुस्तक परीक्षण : शिवाजी कोण होता?


समाजात वावरताना प्रत्येकाला कोणत्यातरी एका समाजाचं असावं लागतं नाहीतर त्याला ओळख प्राप्त होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीची वर्गवारी इथे केलेली आहे. जसं की मानव प्राणी, चार पायांचे प्राणी, दोन पायांचे प्राणी, सस्तन प्राणी, गाणारे, उडणारे प्राणी इत्यादी. अशा असंख्य वर्गवारीत पृथ्वीतलावरील प्राणी विभागला गेला आहे. म्हणजेच विविध जातीत तो गणला गेला आहे. मानव प्राण्यांप्रमाणेच इतर प्राण्यांचेही अनेक प्रजाती असतात. फरक इतकाच की इतर प्राण्यांच्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मावरून गणले गेले आहेत आणि माणसाच्या प्रजाती या व्यवसाय, नोकरीवरून पडल्या आहेत. मी नक्की काय लिहितेय हे इथवर येऊनही तुम्हाला कळलं नसेलच, म्हणून जरा स्पष्टच सांगते की माणसाच्या ज्या जातनिहाय वर्गवारी झालेल्या आहेत त्या नैसर्गिक नसून व्यवहारिक आणि सामाजिक आहेत. मात्र तरीही त्यांचं प्रचंड अवडंबर माजवलं जातं. जात-धर्म, उच्च-निच या गोष्टींनी एकविसाव्या शतकातही परिसीमा गाठली आहे. ही व्यवस्था कधी जन्माला आली, केव्हापासून अशी वर्गवारी सुरू झाली याचा अभ्यास करायचा झाला तर माणसाच्या उत्क्रांतीपासूनचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. पण इतक्या खोलवर जाण्याची गरज नाही. थोडंफार वाचन केलं, आकलन केलं, इतिहासातील दाखले विचारात घेतले तरी आपल्याला याचा उलगडा होऊ शकेल.
त्याचं झालं असं की 'कोण होता शिवाजी?' हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. कॉ.गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक लिहिलंय. तसं पाहता शिवाजी महाराजांवर असंख्य पुस्तकं आलीत. पण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहता आणि आत्ताची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहता 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक आजच्या तरुणांनी, जातीवरून राजकारण करणाऱ्या आणि प्रत्येक धर्मिय वादात शिवाजी महाराजांचा उल्लेख करणाऱ्या प्रत्येक माणसाने हे पुस्तक वाचावं असंच आहे. क्षत्रिय कुलवतंस श्रीराजा शिवछत्रपती यांचा उल्लेख आजवर एका विशिष्ट जाती-धर्मासाठी झाला. मात्र खऱ्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव अशीच स्वत:ची प्रतिमा ठेवली.
'खरे म्हणजे शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पिठावर रेघोट्या उठविणे सोपे असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसहक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता. त्याने राज्य निर्माण केले होते. तो राज्य संस्थापक होता.', असे कॉ.पानसरे या पुस्तकात लिहितात. हा इतिहास सर्वश्रूत आहेच. पण राज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांनी तथाकथित प्रथांना बगल देत समाजातील प्रत्येक व्यक्तीला मानाचे स्थान देऊन राज्य निर्माण केले. त्यांच्या राजदरबारात कोणा एका विशिष्ट धर्माची वा जातीचीच माणसे नव्हती. भारतातील सर्व जाती-धर्मातील माणसे होती. शिवाजी महाराज हे हिंदू धर्म पाळणारे होते. पण त्यांची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म वाढविला पण त्यांनी इतर धर्मांचा आदर राखला. पर धर्मातील लोकांशी सलोख्याने व्यवहार केला. प्रत्येक जातीतील महिलांना आदराने वागणूक दिली. मात्र आता शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांच्या नावाचा उदोउदो करून जागोजागी हिंसा होत आहेत. हे स्पष्ट करताना कॉ. पानसरे म्हणतात की, 'शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला. आता तर त्याला साऱ्या हिंदूचांही ठेवला नाही. त्याला गोब्राम्हण प्रतिपालक केला. मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला. राखीव जागांना विरोध करताना खच्चून शिवाजी महाराज की जय केला. मराठवाड्यात आणि इतरत्र दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी, जय शिवाजीचा घोष केला अन् शिवाजीला फक्त उच्चवर्णींय हिंदूंचा केला. ब्राम्हणांचा अन् नव्या-जुन्या, खऱ्या-खोट्या ९६ कुळीच्या मराठ्यांचा केला.' शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीत बांधून ठेवाणाऱ्यांचा कॉ.पानसरेंनी चांगलीच चपराक लगावली आहे.
म्हणूनच पानसरे नंतर म्हणतात की, 'वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतेने शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असेल तर ते टाकले पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे नेले पाहिजे.'
आपल्या जाती-धर्माचा अभिमान बाळगावा की न बाळगावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. धर्मनिरपेक्ष राहण्यालाही कोणाचाच विरोध नाही. मात्र विविधतेच्या देशात राहताना आपल्या जाती-धर्मासोबतच इतरांच्या जाती-धर्माचा आदर राखणं, त्यांना समान संधी देणं हे प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. विविधतेत एकता असणं म्हणजे काय हे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आचरणातून आपल्याला शिकवलेलं आहे. तेव्हा एकवार विचार करा, आणि सुजाण व्हा. 

Comments

Post a Comment

Popular Posts