अभ्यासखोली


मोठाली घरं पाहिली की मला आजही इर्ष्या निर्माण होते. लोकं एवढ्या मोठ्या खोलीत किती आरामशील राहत असतील नै? कसंही कुठेही पसरा. कोणीही येणार नाही पाय आवरते घे म्हणून सांगायला. लहानपणापासून मला फार वाटायचं, पाहताना थकून जाऊ एवढं मोठं घर असावं. शाळेत असताना मैत्रिणींची मोठाली घरं पाहिली की वाटायचं, साल्या किती नशिबवान आहेत या पोरी. अभ्यासाला खोली, स्वयंपाक खोली, हॉल, बेडरूम. यांना कसं हवं तेव्हा कुठेही आपला पसारा मांडता येत असेल. मी आपली नेहमी पाय आखडता घे, अंग चोरूनच झोप अशा अवस्थेत लहानाची मोठी झाली. माझ्यासाठी अभ्यासाची खोली म्हणजे आमचा उंबरठा. दहावी-बारावीचा अभ्यास मी उंबरठ्यावर बसूनच केला. या दोन्ही परीक्षेच्या वेळेस नेमक्या क्रिकेट मॅच होत्या. त्यामुळे घरात टीव्ही चोवीस तास सुरूच. मग मी माझा पसारा घेऊन उंबरठ्यावर बसायचे. तिथंच अभ्यासाचा संसार टाकायचे आणि वाचन, पाठांतर, लिखाण करायचे. त्यावेळेस बाहेरच्या वर्दळीचा, गोंगाटाचा कधीच त्रास झाला नाही. उलट शांततेत माझं कधीच लक्ष लागलं नाही. पण नेहमी वाटायचं मोठं घर हवं, हवं तिकडे आपलं बस्तान मांडून आडवं-तिडवं होऊन अभ्यास करायला मिळावा. 
तेरावीपर्यंत मी ८ बाय १० च्या खोलीत राहिले. आम्ही एकूण पाचजण. ८ बाय १० च्या खोलीत आम्ही पाचजण, भांडी, कपडालत्ता, पाण्याची भांडी, अंथरूण-पांघरूण, टिव्ही असा लवाजमा असायचा. हे सामान ठेवून जी जागा उरेल तेवढ्याच जागेत वावरायचं. परीक्षेच्या काळात त्याच गोंगाटात अभ्यास करायचा. या सगळ्या अॅडजस्टमेंटची इतकी सवय झाली की नंतर शांतता, स्तब्धता नकोशी वाटू लागते. 
चौदावीला असताना आम्ही दिव्याला शिफ्ट झालो. इथली खोली मोठी. म्हणजे त्या खोलीपेक्षा फारच मोठी. दिव्यात शिफ्ट होताना एकच आनंद होता तो म्हणजे मोठ्या खोलीत राहायला मिळणार याचा. कारण पूर्वी कोणतंही सामान घेताना एक गोष्ट मनात असायची, हे ठेवायचं कुठे? आता तसा प्रश्न सतावणार नव्हता. हवं ते घेता येणार होतं. मोठा टीव्ही, फ्रीज, कपाट, शोपीस असं काहीही. ते घेतलंही. तेव्हा वाटलेलं एवढ्या मोठ्या खोलीत काय काय ठेवायचं नी काय काय नाही. खरंतर ही खोली २८० स्क्वेअरफुटची. पण ८ बाय १० च्या खोलीत राहिलेल्या मुलीसाठी २८० स्क्वेअरफुटची खोली म्हणजे बंगल्यासमानच. आता इतरांची मोठी घरं पाहिली की ईर्ष्या नाही होत. पण मोठं घर असूनही अभ्यासात लक्ष लागत नाही याचं वाईट वाटतं. इथं स्वतंत्र अभ्यास खोली आहे, अभ्यासाची विविध साधनंही उपलब्ध आहेत. पण अभ्यासच होत नाही. सुई पडल्याचा आवाज होईल इतक्या शांततेत मी फक्त झोपू शकते, अभ्यास करणं कठीणच. मला अभ्यासासाठी गोंगाट, गडबड, माणसांची ये-जा लागते. त्याशिवाय काय वाचलं, पाठांतर केलं हे लक्षातच राहत नाही. माणसांच्या आयुष्यात कितीही सुख-सुविधा आल्या तरी त्याला त्याची सवय स्वस्त बसू देत नाही. बीएमएमच्या शेवटच्या वर्गाचा अभ्यास मी ट्रेनच्या गोंगाटात केलाय, म्हणून निदान पास तरी होऊ शकले. एमए करत होते तेव्हा ट्रेनचा फारसा प्रवास नव्हता. म्हणून कदाचित कमी गुण मिळाले असावेत. पायाशी कितीही सुख लोळत असलं तरीही माणसाला त्याच्या जुन्याच गोष्टींची आठवण होत राहते. त्यामुळे आजही कधीही अभ्यासाला बसले की मला माझ्या त्या छोट्या घराच्या उंबरठ्याची आठवण होते. कारण सुविधेपेक्षाही सवय आणि अॅडजस्टमेंटने माणूस मोठा होतो.

Comments

Popular Posts