अंताक्षरी



आठवड्याला सरासरी ४ याप्रमाणे महिन्याला १६ चित्रपट प्रदर्शित होतात. प्रत्येक चित्रपटात किमान दोन ते तीन गाणी असतातच. म्हणजे वर्षाला अगणिक गाणी प्रदर्शित होतात. तरीही अंताक्षरी खेळताना जुनीच गाणी ओठांवर येतात. नव्या गाण्याचे कितीही रसिक असलो तरीही अंताक्षरीत ही नवी गाणी आठवतच नाहीत. गेल्या आठवड्यात मुरबाडला 
गेले होते. तेव्हा बऱ्याच दिवसांनी अंताक्षरी खेळण्याचा योग आला. तसं सतत गाणं गुणगुणत असतेच, पण ऐन अंताक्षरीत गाणी आठवतील तर शपथ. 
त्यादिवशी असंख्य जुनी गाणी ऐकली आणि गायले. जाम आश्चर्य वाटलं. कोणतंही अक्षर असो, जुनी गाणीच प्रत्येकाला स्मरत होती. मग कोणीतरी मोबाईल काढला, गुगलबाबाच्या मदतीने आम्ही नवी गाणी धुंढाळू लागलो. नवी गाणीही पाठ असतात. पण अंताक्षरीत ही जुनी गाणी भुरळ पाडतात, अंताक्षरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. 
अंताक्षरी खेळण्याला वयाचं बंधन नाही. हा खेळ खेळण्यासाठी गळा गोड असण्याचीही गरज नाही. फक्त गाण्यातले शब्द पाठ असले की पाठून कोरस द्यायला अनेक लोक असतातच. कधीकधी गाण्यांच्या चाली माहीत असतात पण नेमकी शब्द आठवत नाहीत. मग त्या चालींनच गाणं सुरू करायचं. धम्माल असते नुसती. आपली स्मरणशक्ती आणि हजरजबाबीपणा हे दोन गुण सुधरवायचे असतील तर वरचेवर अंताक्षरी खेळा. कधीकधी गाण्यांचे बोल लक्षात राहत नाही, अंताक्षरी खेळून खेळून ती गाणी नंतर छान पाठ होतात. आणि हजरजबाबीपणाचं म्हणाल तर, एखादा शब्द आल्यावर त्या शब्दानुसार त्वरीत गाणं आठवलं पाहिजे नाहीतर भेंडी चढतेच. त्यामुळे अंताक्षरी खेळून आपला हजरजबाबीपणाही वाढतो असं मला वाटतं.
अंताक्षरी खेळताना अनेक वयोगटातील माणसं होती. दोन वर्षाच्या चिमुरड्यापासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजोबांपर्यंत सारेचजण होते. त्यामुळे गाणं कोणत्याही एका पठडीतलं नव्हतं. बालगीतं होती, बडबड गीतं होती, शौर्य गीतं होती, भजन, अभंग, किर्तन, प्रेमाची गाणी, निसर्गाची गाणी, कविता अशा कित्येक प्रकारातील जुनी गाणी 
ऐकायला मिळाली. खरंतर मोबाईलमध्ये ही सगळी गाणी असतातच आणि युट्यूबदादामुळे ही गाणी सेव्ह करावी लागत नाहीत. इंटरनेट असलं की पुढच्याच सेकंदाला 
गाणं वाजायला लागतं. मात्र अंताक्षरीत ही गाणी एकत्र गाण्याची मजाच और असते. छान पावसाळी वातावरण, त्यात फ्रेश चेहऱ्याची, आनंदी मनाची माणसं आजुबाजूला 
असली की गाण्यांच्या कार्यक्रमाला उत येतो. मग हळूहळू अंताक्षरीचं रुपांतर मैफिलीत कधी होतं कळतच नाही. त्याला कारणही तसं आहे. अंताक्षरीत येणारी जुनी गाणी ही अर्थपूर्ण, रसपूर्ण असतात. त्यात उगीचच यमक जुळवण्याची घाई नसते. नवी गाणी म्हणजे यमक जुळवलेली वाक्य वाटतात, त्यात अर्थाला जागा नसते. म्हणजे मला सांगा, "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला" या गाण्यात प्रियकराची आर्तता जाणवते. त्यामुळे त्या गाण्यात आपण लगेच समरस होतो. पण त्याचजागी जर आपण म्हणालो, 'साडी के फॉल सा तुने मॅच किया रे छोड दिया दिल तुने कॅच किया रे' हे गाणं गायला लागलो तर कोणी अंताक्षरीत समरस होईल का? 'फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश' हे गाणं तर माझं प्राणप्रिय. माझ्या फेव्हरेट लिस्टमध्ये हे गाणं टॉपला आहे. पहाटेच्या प्रहारात निसर्गात होणारे बदल, हालचाल अगदी चपखलपणे या गाण्यात नमुद झालंय. गाण्याचे बोल तेव्हाच लक्षात राहतात जेव्हा गाण्यातील भाव आपल्याला कळतो. 
आमच्या पदरातील जुनी गाणी संपली तेव्हा आम्ही मोबाईलच्या सहाय्याने गाणी गात होतो. तेव्हा आमच्यापैकीच एक मॅडम म्हणाल्या, 'या आजकालच्या पोरांचं काही खरं नाही. आम्हाला आमच्या पहिली दुसरीतल्याही कविता तोंडपाठ आहेत. नाहीतर ही मुलं, काल ऐकलेलं गाणंही साधं लक्षात राहत नाही. आमची मेमरी आमच्या डोक्यात आहे तर यांची मेमरी यांच्या मोबाईलमध्ये.'
जुनी गाणी अजरामर होण्यामागचं कारण मला तेव्हा कळलं. आपण गाणी नुसती ऐकतो, पसरवत नाही. मोबाईलला कानाचा दोर जोडला की हवी ती गाणी ऐकट्याला ऐकायला 
मिळतात. मग त्यातली किती लक्षात राहतात आणि किती गाता येतात हा भाग निराळा. मुळातच आताच्या पिढीतील मुलांची स्मरणशक्ती अगदी नगण्य आहे. मोबाईलशिवाय 
आमचं पानच हालत नाही. मग अंताक्षरी खेळतानाही आम्ही हळूच गुगल मारतो. गुगलबाबाही आपल्याला चटकन गाणी देतो, तीही जुनीच. पण त्यानिमित्ताने का होईना जुन्या 
गाण्यांची उजळणी तरी होते. आपल्याच विचारात रमणारी, स्वत:पुरतंच गाणं ऐकणारी माझ्यासारखी माणसं चारचौघात गेल्यावर अंताक्षरी खेळायला लागली की कळतं, 'अरे 
व्वाह, हे गाणं आपणच ऐकत नाही तर इतरही ऐकतात की.' मग अंताक्षरीला आणखी मजा येते. असंच वरचेवर अंताक्षरी खेळायला हवं आता.

Comments

Popular Posts