मराठी शाळा टिकतील कशा?

मराठी  शाळा, मराठी शाळांचे इंग्रजीकरण, मराठी शाळांत इंग्रजी शिकवणार,

मराठी शाळांच्या अस्तित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, म्हणून पुन्हा याविषयावर लिहावंसं वाटतंय. आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी होतीच की मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी प्रथम विषय राहणार आहे. म्हणजेच समाजशास्त्र, मराठी विषय सोडल्यास सर्व विषय हे इंग्रजीत शिकवले जाणार. म्हणजे हे मराठीचे इंग्रजीकरण करण्यासारखंच आहे. आधीच मराठी शाळांमध्ये मुलांना टाकण्यास पालक कचरतात, त्यात पालिकेनेच जर मराठीचे इंग्रजीकरण करण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्रात मातृभाषेत शिकवणाऱ्या शाळा कशा शिल्लक राहतील? मुंबई पालिकेचा आदर्श जर इतर पालिकेने किंवा जिल्हा परिषदेने घेतला तर येत्या २- ४ वर्षांतच महाराष्ट्रात मराठी शाळा शिल्लक राहणार नाहीत. 
इथं मुद्दा मराठी शाळा टिकवण्याचा नसून, मुद्दा आहे तो मराठी भाषा टिकवण्याचा. एखादी भाषा जिवंत राहण्यासाठी ती प्रवाही राहणं गरजेचं असतं. आणि शिक्षणातून या भाषा अधिक प्रभावी राहू शकतात. मात्र शाळांचा, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यापेक्षा पालिकेने इंग्रजीकरण केल्याने मराठी अजून किती वर्ष जिवंत राहणार याचं काऊंटडाऊन सुरू होईल की काय याची भिती वाटायला लागली आहे. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय. इयत्ता पाचवीपर्यंत चेंबुरच्या पालिका शाळेत शिकले. त्यानंतर काळाचौकीच्या अभ्यूदय शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झालं. दोन्ही शाळांमध्ये मला दर्जेदार शिक्षण मिळालं. मी शाळेत असल्यापासूनच पालिका शाळेची खरंतर घसरण सुरू होती. मात्र चेंबुरला मी ज्या विभागात राहायचे तिथले पालक दर महिन्याला शाळेतून तांदूळ मिळतात या हेतुने आपल्या मुलांना पालिका शाळेत घालत असत. (आताची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते.) अभ्यूदय शाळेतही दर्जेदार शिक्षण मिळालं. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा सर्वच स्तरांवर या शाळेतून शिक्षण मिळालं. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने माझं कधीच कुठेच अडलं नाही. यावर आमच्या एकाने मला प्रतिप्रश्न केला होता, "तुझं कुठेच अडलं नाही तर मग इंग्रजी वर्तमानपत्रात का लागली नाहीस?" मुळात इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणं हे माझं उद्दीष्टच नसल्याने मी तिथं जाण्याचा प्रयत्नच केला नाही. मी मराठीतून जास्त चांगलं व्यक्त होऊ शकते, आणि असं असलं तरीही मी इंग्रजीतही लिहू शकते. फरक इतकाच की कोणत्याही विषयावर लिहिताना मी कोणत्या भाषेत एखादा मुद्दा मांडू शकते यावर मला विचार करावा लागतो. 
मराठी  शाळा, मराठी शाळांचे इंग्रजीकरण, मराठी शाळांत इंग्रजी शिकवणार,

मराठी माध्यमातून शिकल्याने भाषेचा अडसर येत नाही यावर माझं ठाम मत आहे. कारण इयत्ता पहिलीपासून आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या तिनही भाषा असतात. आपण या भाषांचा कसा अभ्यास करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आमच्या दिव्यात सध्या इंग्रजी शाळांचं प्रचंड पेव सुटलं आहे. कमी पैशांत इंग्रजी शिक्षण मिळत असल्याने साहजिकच मराठी शाळा ओस पडणारच. मात्र या शाळांमध्ये अत्यंत टुकार शिक्षण पद्धती आहे. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या उपक्रमांची आवश्यकता असते ते उपक्रम शाळांमधून राबवले जात नाहीत. (मात्र त्या उपक्रमांचे पैसे उकळले जातात.)ही अवस्था केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचीच नाही तर मराठी शाळांचीही आहे. कोणतीही शाळा टिकवायची असेल तर त्या शाळेने शैक्षणिक दर्जा सुधरवायला हवा. चेंबुरची चेंबुर हायस्कूल, काळाचौकीतल्या अभ्यूदय हायस्कूल, शिवाजी शाळा, सायनची शिव हायस्कूल या दर्जेदार मराठी शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. मराठी शाळा टिकवण्यासाठी दर्जेदार उपक्रमांची आवश्यकता आहे, वर उल्लेख केलेल्या शाळांमधील उपक्रमांचा आदर्श घेतल्यास अनेक मराठी शाळा पुन्हा उभारी घेतील.
आमच्या गावच्या (जि.रत्नागिरी, ता.राजापूर)जि.पच्या शाळेत उत्तम शिक्षण मिळतं. केवळ शिक्षणच नाही तर मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी येथील शिक्षक झटतात. इंग्रजी, गणित या विषयात मुलं सहसा मागे राहत नाहीत. ग्रामीण भागात जर जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम शिक्षण देत असतील तर शहरात पालिकेच्या किंवा अनुदानित मराठी शाळांना फारसं अवघड नाही. 
मध्यंतरी मी एका संकेतस्थळासाठी काम करत होते. त्यावेळी अनेक देशी-परदेशी इंग्रजी संकेतस्थळांशी माझा संपर्क आला. आपल्याकडे वर्तमानपत्रांत अत्यंत बोजड आणि कठीण इंग्रजी वापरली जाते. मात्र परदेशी वृत्तसंस्थांची भाषा अत्यंत सुटसुटीत आणि समजण्यासारखी असते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय इंग्रजी पहिल्या वाचनात मला समजतच नाही. त्यासाठी मला निदान दोनदा तरी वाचावं लागतं. मात्र परदेशी इंग्रजी वर्तमानपत्र किंवा वृत्तसंस्थांवरील बातमी पहिल्याच वाचनात लक्षात येते. 
याचं कारण असं की यापैकी अनेक देशांची मुळातच मातृभाषा इंग्रजी असल्याने त्यांना कठीण शब्द लिहावेसे किंवा कठीण शब्दांत व्यक्त व्हावसं वाटत नसणार. आपण जसं (म्हणजे ज्यांची मराठी ही मातृभाषा आहे)अगदी सहजपणे मराठी लिहू तसे ते इंग्रजी लिहित असणार. मात्र आपल्याकडे इंग्रजी हा शिकाऊ विषय वा भाषा असल्याने आपण त्यातल्या तांत्रिक नियमांचा वापर करून बोजड शब्द वापरून इंग्रजी लिहितो. 
दुसरा मुद्दा असा की माझ्या अनेक मैत्रीणींचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय. मात्र त्यांचं मराठी अत्यंत अस्खलित असतं, कारण त्यांच्या घरात मराठी वातावरण आहे. आता हल्ली असं मराठी वातावरण फारसं कोणाच्या घरी नसतं. कारण प्रत्येक तरुण पालक आपल्या मुलांना चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नाही शिकवत, तर ते ट्विंकल टि्वंकल लिटिल स्टार शिकवत बसतात. असो, आपल्या पाल्यांना कोणत्या भाषेत शिकवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मराठी माध्यमातून शिकलेले, मराठीच मातृभाषा-बोलीभाषा असलेले, मराठी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या आम्हा मराठी बांधवांना मराठी भाषा, मराठी शाळा टिकाव्यात असं मनापासून वाटतं. म्हणूनच मातृभाषेतलं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगावंसं वाटतं. बाकी पालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी जो इंग्रजीकरणाचा घाट घातला गेलाय तो तसाही यशस्वी होणार नाहीए कारण शैक्षणिक दर्जा सुधारलाच नाही तर पालक आपल्या मुलांना पालिका शाळेत टाकतीलच का?

हेही वाचा: 

पुस्तक परीक्षण : शिवाजी कोण होता?


Comments

Popular Posts