प्रवास


चार्ज केलेला हेडफोन, मोबाईल, सोबत बॅटरी बॅकअप, आवडती पुस्तकं, मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये भरमसाठ गाणी, युट्यूबवरून ऑफलाईन डाऊनलोड करून ठेवलेले चित्रपट आणि मनोरंजन व वेळ घालवण्यासाठी जे जे शक्य होईल त्या सर्व वस्तुंची तजवीज झाली की प्रवास सुरू करायचा. प्रवासात काय काय करायचं, काय वाचायचं, ऐकायचं, पाहायचं हे सारं आधीच ठरलेलं असतं. लांबचा प्रवास असेल तर वेळ घालवण्यासाठी जमेल तितकी साधनं जवळ ठेवते मी. पण या साधनांचा कधीच वापर केला गेला नाही, याचं आश्चर्य वाटतं. कितीही लांबचा प्रवास असला तरीही पुस्तकाचं पानही उलटलेलं नसतं आणि हेडफोन बॅगेतून बाहेरही काढलेला नसतो, युट्यूबवर डाऊनलोड केलेले चित्रपट परतीच्या प्रवासातही पाहिले जात नाही. कारण प्रवासात वाचणं, ऐकणं, झोपणं असं काहीच फारसं आवडत नाही. आपली विंडोसीट पकडायची आणि खिडकीतून जे जे दृष्य दिसत जाईल ते ते डोळ्यांत सामावून घ्यायचं हा माझा आवडीचा छंद. कोकणातला प्रवास असेल तर मग विचारायलाच नको. गाडीच्या खिडकीतून दिसणारं सारं दृष्य एका दमात पाहून घ्यावं असं वाटायला लागतं. आपल्या खिडकीतून काय दिसतंय, दुसऱ्यांच्या खिडकीतून काय दिसतंय, हे सतत पाहत राहायचं. मिट्ट काळोखातही मी इतर गाडांच्या प्रकाशातून वाट शोधत राहते. कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून मिट्ट काळोखात प्रवास करणं म्हणजे एक अद्भूत सुख आहे. प्रवासादरम्यान पावलापावलावर भेटणारी गावं, रस्त्याच्या कडेला असलेली मंदिरे, या मंदिरांना असलेली विविध नावे असं काहीबाही वाचण्यात माझा प्रवासातला वेळ जातो. कोणत्या भागात दुभती जनावरं आहेत, कोणत्या भागात शेती केली जाते, कोणत्या भागात लोकांनी शेती पार सोडूनच दिलीय हे सारं कळत जातं. एखाद्या गावात अमुक एका देवाच्याच नावाच्या पाट्या दुकानांवर दिसतात, तर काही गावात दुकानंच ओस पडलेली असतात. पुस्तकात तोंड खुपसून राहण्यापेक्षा किंवा मोबाईलमध्ये मग्न राहण्यापेक्षा मान ताठ ठेवून प्रवासात दिसणारं सारंकाही डोळ्यांत सामावून घ्यायला मला आवडतं.
रस्त्याच्या दोन्ही कडेला पूर्वी शेती केलेली असायची, आताशा लोकांनी शेती सोडून दिल्याने मळ्यांमध्ये रान तयार झालेलं आहे. शिवाय कोकणात पाऊस तुफान असल्याने नद्या, ओहळे दुथडी भरून वाहतात. त्यामुळे या नद्यांचं पाणी पार शेतात घुसतं परिणामी शेतीचं नुकसान होतं. यंदा तर काही ओहोळांचं पाणी पार रस्त्याला लागलेलं. काही ठिकाणी पुलांवरून पाणी वाहून गेल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प. पुलावरून पाणी ओसरेल तेव्हा वाहनचालक वाट काढत पुढे जातात. शिवाय डोंगरदऱ्यातून दरड कोसळण्याची भिती. त्यामुळे कोणत्या क्षणी आपल्या समोर काय वाढून ठेवलेलं असेल याची वाहनचालकाला भितीच वाटत असेल नै. पण हा कोकणातला प्रवास नेहमीच सुखावणारा असतो. पावसाची साथ असेल तर आहहाह....क्या बात....आपल्या वाटेवर हिरवळीनं स्वागत करावं तशी वाट दिसत जाते. आजुबाजूचा परिसर संपूच नये. हे सुख थांबूच नये असं वाटत राहतं. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो, मग तो गावतल्या रस्त्यांना का नसेल? शेवटी शहराकडची वाट दिसायला लागते आणि शांत, सुंदर, रमणीय वातावरणातून आपण चटकन शहरात प्रवेश केल्याचं आजुबाजूच्या गोंगाटातून जाणवतं. मग गाडी पळतेय त्या दिशेने पाहावं की आपली गावची वाट मागे राहिली त्या दिशेने पाहावं या संभ्रमात जीव कासावीस होऊन जातो.

Comments

Popular Posts