माणसाच्या रुपात भेटलेला देव


आता आताशा डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश होता. चहुबाजूचं निसर्गरम्य वातावरण अगदी स्वच्छ दिसत होतं. नदी, नाले वाहत होते, पक्षी किलबिलत होती. हिरवळीनं आपले हातपाय मस्तपैकी पसरले होते. हे विलोभनीय दृष्य पाहत असताना अचानक डोळ्यांसमोर धुकं आलं. पांढरा-काळा रंग हातात हात घालून एकत्र आपल्या स्वागताला आलेत की काय असं वाटू लागलं. पण छे.. हे स्वागत कसलं? भयान होतं सारं. अचानक कुठून हे धुकं पसरलं? गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशातही नुसतं पांढरफटक वातावरण दिसत होतं. घड्याळात तर सहाच वाजलेत. एवढ्यात कसा अंधार होईल? गाडीने घाट उतरायला सुरुवात केल्यास मिनिट उलटत नाही तोवर या धुक्याने गाडीचा पाठलाग केला आणि चक्क गाडीच्या समोर येऊनच धडकला. आता काय करावं? काहीच सुचेना. आहोत तिथं थांबावं तर हिंस्त्र प्राण्यांची भिती आणि गाडीच्या मंद प्रकाशात घाट सर करावा तर अपघात होण्याची भिती. पाठी वळून पाहिलं तर आमच्या गाडीच्या मागे आणखी चार पाच गाड्या आमच्या आशेवर उभ्या असलेल्या दिसल्या. धुक्यात हरवलेल्या घाटातून उतरायला कोणीच पुढे येईना. सायंकाळची वेळ असल्याने धुकं कमी होईल याची अजिबात शाश्वती नव्हती. हळूहळू गाडी पुढे जात होती, पण पोटात भितीचा मोठ्ठा गोळा तयार झालेला. अचानक कुठे वळण लागलं आणि रस्ता दिसलाच नाही तर थेट दरीत कोसळणार. म्हणून पुन्हा आहोत तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला. आधीच ट्राफिकमधून वाट काढत आता कुठे गावच्या रस्त्यांवरून सुसाट गाडी पळत होती तोवर धुक्यानं गाठलं. वातावरणानं अचानक कशी कुस बदलली काहीच कळेना. अगदी डोळ्यांसमोर वातावरणाचं पालटलेलं रुप पाहिलं आम्ही. धुकं कमी होण्याची वाट पाहत होतो, पण ते क्षणाक्षणाला अधिक गडद होत होतं. तेवढ्यात एका दुचाकीवरून एक इसम आला. तो तिथलाच रहिवासी होता बहुतेक. त्यामुळे या घाटावरची वळणं त्याच्या तोंडपाठ होती. आमच्यासमोबत आमच्यामागे उभ्या असलेल्या गाड्या त्याने पाहिल्या. आम्ही न बोलताच त्याला आमची समस्या कळली. त्याने खुणेनंच सांगितलं, 'मी तुमच्या पुढून माझी गाडी नेतो. मी सांगतो त्या इशाऱ्याने तुम्ही या.' हा दुचाकीवाला इसम आल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. रस्ता दिसत नसला तरी निदान कळेल तरी या आशेवर आम्ही आणि आमच्या मागे असलेल्या गाड्या या दुचाकीवाल्याच्या मागोमाग नेऊ लागलो. वळण आलं की तो हात वळवून वळण आल्याचं दर्शवायचा, खड्डा असला की खुणेनं सुचना करायचा. समोरून गाडी येत असेल तर त्याचीही सुचना द्यायचा, मोठं वळण असेल तर त्याची दुचाकी थांबवून तो मोठं वळण असल्याचा इशारा द्यायचा. असं करत करत शेवटी आम्ही घाटावरून खाली उतरलो. घाट उतरल्यावर धुकं हळूहळू कमी होत गेलं, आणि पायथ्याशी आल्यावर धुकं अचानक पळून गेलं.
कोल्हापूर- रत्नागिरीला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटावर आलेला हा अनुभव. अनुस्कुरा घाट आम्हा सगळ्यांचा आवडता. दऱ्या खोऱ्यातून निघालेला हा घाट सगळ्यांनाच आवडतो. पण यंदा या घाटाने आमचा चांगलाच घाम फोडला. पण देव असतो या संकल्पनेवर विश्वास ठेवला आणि साक्षात माणसाच्या रुपानेच देव धावून आला असं वाटलं. त्याच्या दुचाकीचा नंबर मी नोट करून घेतलाय. पण जाता जाता त्याला धन्यवादही म्हणता आलं नाही याचं दु:ख वाटलं. घाट संपल्यावर त्याने 'मी पळतो' अशी खुण केली आणि लागलीच त्याने धूम ठोकली. त्यानंतर आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो भेटला नाही. देव आहे की नाही यावर अनेक मतं असतील पण माणसाच्या रुपातून भेटलेला देव मी पाहिला. शेवटी ही बाप्पाचीच कृपा असावी. बाप्पाच्या सेवेसाठी जाताना आलेल्या कटू प्रसंगातून बाप्पानंच वाट दाखवली की काय असं क्षणभर वाटून गेलं.

Comments

Popular Posts