एक कप'टी'

एक काळ असा होता, जेव्हा चहा म्हंटलं की मला ओकारी यायची. लोकांना चहाचं व्यसन लागतं हे ऐकून तर मला आश्चर्यच वाटलं होतं. म्हणजे पान-सिगारेट, दारूचं व्यसन समजू शकतो, पण चहाचं व्यसन कसं लागू शकतं लोकांना? कुणा पै पाहुण्यांकडे गेल्यावर आई कौतुकाने सांगायची, 'आमच्या बायला की नै चहा नाही आवडत हो!' तेव्हा पाहुणे कौतुक करायचे, म्हणायचे लहान पोरांनी चहा पिऊच नये, आणि असं म्हणत ते स्वतः चहाचे 2 पेले रिते करायचे.
चहासोबत कॉफीचीही मी कधी प्रेमी नव्हते. रात्रभर बसून अनेकदा प्रोजेक्ट बनवले पण कधी उठून चहा किंवा कॉफी प्यायले नाही. झोप उडवण्यासाठी चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला की झोप गुडुब व्हायची. मैत्रिणी चौकातल्या टपरीवर चहा पित बसायच्या. तरीही मला कधीच चहाची तल्लफ आली नाही.

कॉलेज संपलं आणि काम सुरू झालं. प्रहारमध्ये असताना सुरुवातीला कॉफीची सवय लागली, तेही सहकाऱ्यांमुळेच! नंतर नंतर ही सवय इतकी कठोर झाली की कॉफीशिवाय कामंच सुचायचं नाही. ऑफिसमध्ये गेल्या-गेल्या कॉफी घशाखाली गेलीच पाहिजे. मग हळू हळू चहाही घेऊ लागले. मग दिवसातून चहा-कॉफी असं दोन्ही पेय घेत राहिले. पण अंतकरणाला भावेल असा चहा कुठेच सापडला नाही. त्यानंतर मी महाराष्ट्र दिनमानमध्ये लागले आणि चहाचा तिरस्कार एकदम निघून गेला. दिनमानमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने चहाची चाहती झाले. चहा म्हणजे काम आणि काम असेल तेव्हा चहा असं समीकरणच झालं. गाडी स्टार्ट करण्यासाठी जशी चावीची आवश्यकता आहे अगदी तसंच कामाला सुरुवात करण्याआधी चहाची चावी शरीराला द्यावीच लागते.

तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला जेवण आणि तल्लफ आलेल्या माणसाला चहा देणं हा आपला धर्म आहे, असं मला वाटतं. बरं, हा चहा कोणाच्याही हातचा चालत नाही, तो ठराविक व्यक्तीने बनवलेलाच हवा असा माझा अट्टाहास असतो. दिनमानमध्ये असताना आमचे एक सहकारी फक्कड चहा बनवायचे. त्यांनी चहासाठी पाणी गॅसवर ठेवलं तरी चहाचा दरवळ ऑफिसभर पसरायचा. तसंच, आमच्या शेजारी एक वाहिनी राहतात, त्यांच्या हातचा चहाही अमृततुल्यच आहे. सुट्टीवर असले की रोज सायंकाळचा चहा त्यांच्याकडे ठरलेलाच असतो. आता A one marathi च्या ऑफिसमध्येही आम्हीच आमचा चहा करून पितो. पण माझी सहकारी किरण हिने बनवलेला चहा म्हणजे आह हा! क्या बात... साखर, दूध, पाणी, चहापत्ती यांचं योग्य मिश्रण म्हणजे अमृततुल्य तयार होतो. ज्या व्यक्तीला फक्कड चहा बनवता येतो त्या व्यक्तिचं आयुष्य अमृतासारखं गोड गोड होत असेल नै!

हल्ली तर कोणाकडे गेले तर हक्काने चहाचा आग्रह करते. टपरीवर चहावाला चहाला जेव्हा उकाळी देतो तेव्हा असं वाटतं आताच चहाचं पातेलं तोंडाला लावावं आणि एकाच घोटत चहा फत्ते करावी.
चहाचे अनेक तोटे सांगितले जातात. दारूपेक्षा चहा वाईट असं हेडींग करून प्रहारमध्ये मी 1 लेखही छापला होता. आरोग्याच्या दृष्टीने चहा वाईट असेलही, पण चहाची तल्लफ आल्यावर कसलं आरोग्य नि कसलं काय? कामाच्या गडबडीत अनेकदा पाणी, जेवण विसरायला होतं. तहान- भूक लागलेली असतानाही या गरजा पुढे ढकलल्या जातात. पण दुपार सरत आली की चहा पाहिजेच! चहाची गरज पुढे ढकलताच येत नाही. नाहीतर तोवर कामासाठी किकच मिळत नाही. 




Comments

Popular Posts