...आणि काय हवं?

काही हलकं फुलकं, ज्यात ड्रामा नसतो, रहस्य नसतं, भिती नसते, फुक्कटचे अश्लील विनोद नसतात असं काही पाहायचं असेल तर एमएक्स प्लेअरवरची आणि काय हवं ही वेबसीरिज नक्की पाहा. मी लिहितेय ते काही समिक्षण वगैरे नाहीये. पण मला वैयक्तिक ही सीरिज फार आवडलीय. याआधी डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या अनेक वेबसीरिज पाहिल्यात, आवडल्याही आहेत. पण ज्यावर मनापासून लिहावंसं वाटलं ती ही एकमेव सीरिज. जुई आणि साकेत या अरेंज मॅरेज झालेल्या जोडप्याची ही कथा. ही कथा कोणत्या कॅटगरीत बसेल हे माहित नाही, पण सगळ्याच कॅटगरीच्या चौकटी मोडून काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न या सीरिजमधून झालाय हे नक्की.
प्रिया बापट आणि उमेश कामत माझे आधीपासूनचेच आवडते कलाकार. प्रिया बापटच्या दे धमाल या मालिकेपासून मी तिला फॉलो करतेय. म्हणजे मी तेव्हा लहान होते, पण मला ती तेव्हापासून आवडते. त्यानंतर ती अधुरी एक कहाणीमध्ये अपर्णाच्या भूमिकेत दिसली. अत्यंत कमी कालावधीसाठी होती ती, पण तिला पाहताना भारी वाटायचं. कालांतराने तिची मध्यवर्ती भूमिका असलेली शुभं करोती या मालिकेतून तिची भेट झाली. उमेश कामतला मी तिथूनच फॉलो करायला लागले. शुभं करोतीनेही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण फार कमी कालावधीत ही मालिका संपवली, म्हणून या मालिकेची गोडी अजूनही कायम आहे. 
रिल आणि रिअल लाईफमधलं हे जोडपं फार सहज अभिनय करतात, म्हणजे मलातरी तसं वाटतं. आणि काय हवंमध्येही जुई आणि साकेत तितक्याच सहजतेने वावरतात. ही सीरिज पाहण्याआधी मला वाटलं की जोडप्यांमधलं भांडण, राग-रुसवे-फुगवे असं काहीतरी या सीरिजमध्ये असेल. पण जोडप्यांमधील एक वेगळा पैलू या मालिकेने लोकांपर्यंत पोहोचवलाय. नवरा बायकोचं नातं केवळ संसार, भांडण आणि शरीरसुखापर्यंत मर्यादित नसतं तर त्यांच्यातही चांगली मैत्री असते हे दाखवणारी ही सीरिज आहे. मला वैयक्तिक लव्ह मॅरेजवर विश्वास नाही. अरेंज मॅरेजमधलं नातं फार नितळ, सखोल असतं असं मला वाटतं, म्हणूनच मला ही सीरिज भावली असेल. अरेंज मॅरेज करूनही नवरा-बायकोमध्ये मैत्री टिकवता आणि जपता येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सीरिज. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांच्या आवडी-निवडी जपल्या की नातं अधिक खुलू लागतं, आणि हे जपणं, समजून घेणं मुळातच दोघांच्याही मनातून आलं पाहिते, हे दर्शवणारी ही सीरिज. त्यामुळे पहिल्याच ओळीत म्हटलं तसं, काही हलकं-फुलकं, डोक्याला ताण न देणारं, मूड फ्रेश करणारं, चेहऱ्यावर स्मित हास्य देणारं काही पाहायचं असेल तर ही सीरिज पाहा. आणि तुम्हाला कशी वाटली हेही कळवा. 

Comments

  1. छान! या लेखामुळे ही सिरीज बघायची उत्सुकता वाढली आहे. अल्फा मराठी जेव्हा नवीन आलं, त्यावेळेस आपल्या जगण्याशी संबंध असलेल्या कथा आणि पात्रं घेउन काही सिरिअल्स सुरू झाल्या. मागे ऐंशी नव्वदीच्या दशकापासूनच मध्यम वर्गाच्या रोजच्या जगण्याची व्यथा आणि गाथा मांडणाऱ्या सिरिअल्सना सुरुवात झाली होती.

    आजच्या सिरिअल्स या मनाला भावत नाहीत. वेब सिरिझेस कडून बरीच आशा आहे... जगात कुठेच नाही एवढा दर्जेदार कथांचा खजिना मराठी साहित्यात आहे. आता त्यात उतरण्यासाठी तेवढे धीराचे निर्माते आणि दिग्दर्शक मात्र हवेत...

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं....अभिप्रायाबद्दल धन्यवाद

      Delete

Post a Comment

Popular Posts