एकमेंका सहाय्य करू!


समजा या काळात कोणी नवी संकल्पना आखत असेल, नवा उद्योग-धंदा-व्यवसाय करत असेल तर त्याला मनमोकळेपणाने मदत करणं आपलं कर्तव्य आहे. मदत केवळ आर्थिकच असते असं नाही. आपलं मानसिक पाठबळही समोरच्याला प्रोत्साहन देऊ शकतो. कारण सध्याची कमाई बचतीसाठी नसेल तर ती जगण्यासाठी असेल.
लोकांकडची सेव्हिंग्स संपत आली आहेत. मुळात सामान्य वर्गाला सेव्हिंग्स करणं जमत नाही. त्यामुळे या तीन चार महिन्याच्या कालावधीत त्यांची चांगलीच ससेहोलपट झालेली आपण प्रत्येकानेच अनुभवली. त्यावरही मात करत अनेकांनी वेगवेगळे उद्योगधंदे, स्टार्टअप्स सुरू केले. मात्र त्यावर अनेकजण
आता हसतायत. कोणी युट्यूब चॅनेल वा एखादं मिम्स पेज तयार केलं तर जळाऊ वृत्तीच्या लोकांकडून त्यावर टीका होते. पण मला वाटतं, एकमेकांना आधार देण्याची, साथ देण्याची हीच वेळ आहे.
एखाद्या मित्राने त्याचं चॅनेल सबस्क्राईब करायला सांगितलं तर मोठ्या मनाने सबस्क्राईब करा, त्याला अजितबात पैसे लागत नाहीत. त्याच्या कॉन्टेटला दाद द्या. चॅनेलच्या उभारीसाठी आणखी काही करता येत असेल तर तसे सल्ले द्या. कोणी व्यवसाय सुरू केला असेल तर कोणत्याही डिस्काऊंटशिवाय त्याच्याकडून खरेदी करा. कोणाच्या तरी कलेची आवर्जुन तारीफ करा. कोणाच्या कलागुणांना तुमच्या शब्दांनी प्रोत्साहन द्या. कोणी चुकत असेल, तर त्यांना चुका समजावून सांगा. (टीका करणं आणि चुका सांगणं यात फार फरक आहे, बरं का) कारण, सध्याच्या काळात उभं राहण्याची गरज आहे.
कोणाची नोकरी गेलीय, कोणाचा वडिलोपार्जित व्यवसाय बुडालाय, कोणाची रोजंदारी थांबलीय आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. एकमेकांच्या साथीनेच आपण सगळे आर्थिक गर्तेतून बाहेर पडू असं वाटतंय.

Comments

Popular Posts