प्रिय लोकल, लवकर भेटूया



 प्रिय लोकल,

गेल्या कित्येक दिवसांत तुझी भेट झाली नाही म्हणून हा पत्रप्रपंच. पाच सहा महिन्यांपूर्वी तुझा खूप राग यायचा. किती भरगच्च भरून यायचीस स्थानकात. ८.३६ ला तुझी भेट होण्यासाठी मला ८ वाजताच घर सोडावं लागायचं. पण कधी मला उशीर झालाच तरी तू थांबायची नाहीस. तुला उशीर झाला की बरोब्बर मला वाट पाहायला लावायचीस. कधीकधी तर स्थानकात पोहोचायला मला सेकंदभराचा उशीर झाला तरी डौलात माझ्यासमोरून मुरडून निघून जायचीस, तेव्हा वाटायचं कसला माज असेल तुला? इतका माज घेऊन कुठे जाणार आहेस? पुढच्याच स्थानकात ना, मग जरा थांबली असतीस तर काय बिघडलं असतं? कारण आपली नेहमीच्या वेळेतील भेट हुकली की पूर्ण दिवस पुढे उशीराने चालायचा. सगळ्याच गोष्टीला उशीर व्हायचा. पण तुला होतं का कोणाचं सोयर-सुतक?
पण तरीही तू आवडायचीस. आजही आवडतेस, म्हणूनच तर इतक्या दिवसांचा विरह सहन झाला नाही म्हणून थेट पत्र लिहितेय. अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत इच्छुक स्थळी तू अगदी सुरक्षित (?) पोहोचवतेस. कधी भरगर्दीत धक्के खात तर कधी आरामशीर प्रवास घडवतेस. रस्तेमार्गाचा प्रवास नकोसा वाटतो. म्हणजे लोकलमधील गर्दी परवडली पण रस्त्यावरची ट्राफिक नको असं वाटतं. म्हणून म्हणते पुन्हा आपली भेट सुरू करूया. कधी उशीर केलास तरी चालेल, पावसात अडकून पडलीस तरी चालेल, पण पुन्हा भेटूया. बस, टॅक्सीची काही खात्री देता येत नाही. ते भररस्त्यात कुठेही एकटं सोडून निघून जातात. पण तू तसं करत नाहीस. पाऊस-पाण्यात अडकून पडलीस तरी तासाभरात वेगाने दौडत राहतेस म्हणून मला तुझ्यासोबतचा प्रवास आवडतो. कितीवेळा रात्री-अपरात्री तुझ्यासोबत प्रवास केलाय, पण कधीच असुरक्षित वाटलं नाही. तुझ्यासोबत बिंधास्त हिंडायचे दिवसरात्र, फार मज्जा यायची. पण आता असं मनमोकळं फिरता येत नाही. घरातून बाहेर पडताना परत घरी किती वाजता परतू हा प्रश्न समोर असतो. तुझ्यासोबत प्रवास करताना अशी धाकधूक नसायची. वेळेच्या बाबतीत तासभर उशीर व्हायचा घरी यायला पण घरी पोहोचू की नाही असा प्रश्न उद्भवायचा नाही. आता मात्र, घरातून बाहेर पडताना असंख्य प्रश्न डोक्यात असतात. मला आजही स्वप्न पडतात की माझी नेहमीची लोकल मी मीस केलीय आणि पुढे तासभर लोकलच नाहीयेत, आणि मग धाडकन जागी होते आणि आठवतं अरेच्चा अजून लॉकडाऊन उठलाय कुठं?
तुझ्यासोबतच्या प्रवासात कित्येक लोकांना जोडलंय मी या गेल्या सहा वर्षांत. भरगच्च गर्दीत बीएमएम, एमएचा अभ्यास केलाय. टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतले आहेत, दिले आहेत. मनसोक्त शॉपिंग केलीय. विणकाम शिकलेय, अनेकांची सुख-दु:ख ऐकलीयत, गॉसिप्स केलेत अजून काय काय सांगू? म्हणून सांगते ये की पुन्हा पूर्वपदावर. तुला आता रेल्वेरुळांवरून धावताना पाहिलं की जाम ईर्ष्या निर्माण होते. तू आता आमच्यासाठी नाही धावत. तुझ्या धावत्या देहाकडे पाहिलं की सारंकाही आठवत राहतं. आमच्यासाठी कधी धावणार तू? तुझ्या एका भेटीसाठी आमची पुन्हा कधी धावपळ सुरू होणार? तू भेटत नाहीस म्हणून संपूर्ण मुंबई थांबलीय असं वाटतंय. रुळांवरची धडधड ऐकण्यासाठी सगळ्यांचेच कान तरसले आहेत. तुझ्यातल्या गर्दीत गुदमरण्यातही एक आनंद होता गं, ऑफिसचा राग लोकलमधल्या सहप्रवशांवर काढता येत होता, आता कोणाशी भांडायचं? म्हणून म्हणतेय भेटूया का पुन्हा? तू भेटशील ना? पुन्हा नव्याने भेटूया, नव्या वेळेत... तोवर काळजी घे हं.
तुझीच प्रवासी
@स्नेहा
Photo By-
Akki Shamsundar

Comments

Popular Posts