स्कोलिओसिस, पाठदुखी आणि योगसाधना



स्कोलिओसिसचं निदान झाल्यापासून आजवर सोबत राहिलेली एक गोष्ट म्हणजे पाठदुखी. अगदी पाठदुखी माझ्या पाचवीलाच पुजलेली की काय असा प्रश्न पडतो कधीकधी. उपचार, औषधं घेऊनही पाठदुखीने पाठ काही सोडली नाही. अशा परिस्थितीच शाळा-कॉलेज पूर्ण केलं. वह्या-पुस्तकांचं ओझं वाहता यायचं नाही म्हणून आई शाळेतून घ्यायला यायची. दप्तरात एवढं ओझं भरतेस म्हणून पाठ दुखते अशी तक्रार पप्पा करायचे. पण पाठदुखी थांबवण्यावर कायमचा उपाय काही सापडला नाही.

पेन किलर हा एकमेव उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण कोणत्याही पेन किलरचा मारा मला माझ्या शरीरावर करून घ्यायचा नव्हता. मी आजारी पडले तरी शक्यतो घरच्या उपचारांनी बरं होण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पेन किलरचा ऑप्शन मी तेव्हाच बंद केला. पण पाठदुखी तर घालवायची होतीच. कारण पूर्ण आयुष्यभर मला दुखणं पाठीवर घेऊन जगायचं नव्हतं. त्यामुळे यासाठी नक्की काय करता येईल यावर अभ्यास सुरू केला. जगभरातील स्कोलिओसिसच्या रुग्णांचे रिव्ह्यू वाचले. यासाठी फेसबूकची खूप मोठी मदत मिळाली. फेसबूकवर जगभरातील स्कोलिओसीसच्या रुग्णांचा एक समूह आहे. त्यात प्रत्येकजण आपले अनुभव, उपचार पद्धती शेअर करत असतात. पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना योग्य उपाय असल्याचं या ग्रुपमध्ये अनेकांनी सांगितलं.

योगसाधनेचा उपाय सापडल्याने मी एक योग क्लासही लावला. पण योगमुळे दुखणं थांबायचं सोडून आणखी वाढायला लागलं. मग ट्रेनरने सांगितलं की सुरुवातीचे काही दिवस त्रास होतो, शरीराला सवय झाली की त्याचा परिणाम जाणवतो. म्हटलं करून पाहुयात. पण नाहीच. सतत तीन महिने योग करूनही दुखणं कमी झालं नाही. ते दुखणं थांबवण्याकरता पुन्हा डॉक्टरांचे उंबरठे झिजवावे लागले. पुन्हा ऑर्थोपेडीक सर्जनकडे गेले. म्हटलं ऑपरेशन करून पाठदुखी थांबणार असेल तर मी आताच्या आता ऑपरेशन करून घ्यायला तयार आहे. तर डॉक्टरांनी ऑपरेशनचा पर्ययाही फेटाळला. ऑपरेशन करून चांगल्या धड-धाकड शरीराची वाट लावू नकोस असा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनीच नकार दिला म्हटल्यावर त्यांच्यापुढे हट्ट करण्यातही अर्थ नव्हता. मी नियमित योग करूनही पाठदुखी थांबली नाही, असं डॉक्टरांना सांगितलं. ‘कोणतेही योगप्रकार करून पाठदुखी थांबणार नाही. प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते. प्रत्येक आजाराला, व्यंगाला वेगवेगळे योग प्रकार डिजाईन केलेले आहेत. तू योग्य फिजिओथेरेपिस्टकडे जा. नक्की फरक पडेल’, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी सांगितल्यानुसार फिजिओथेरेपिस्टकडे गेले. त्यांनी सगळी हिस्ट्री चेक केली. सगळे रिपोर्ट्स तपासले. त्यानुसार योग प्रकार सांगितले. तेच योगप्रकार गेले २ वर्ष करतेय. आणि तब्बल ९५ टक्क्यांनी आता पाठदुखी कमी झालीय. फक्त मासिक पाळी येण्याच्या दोन दिवस आधी पाठ दुखते. पण तीही सहन होण्याइतपतच दुखते. त्यामुळे योगसाधनेला माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मी नियमित मोजून १५ ते २० मिनिटं योगा करते. सुट्टीच्या दिवशी अर्धातास वगैरे. पण दिवसाची सुरुवात योगाने होत असल्याने दिवसभर अजिबात थकवा जाणवत नाही. सतत चिअरअप राहता येतं. पूर्वी व्यायमाचा फार कंटाळा यायचा, आता मी स्वत: उत्स्फूर्ततेने व्यायाम करते. नवनवे प्रयोग करून बघते. कोणते योग प्रकार माझ्या शरीराला सूट होताहेत हे तपासते.

स्कोलिओसीसमुळे बिघडलेलं बॉडी पोश्चरही बदलायला मदत होतेय. त्यामुळे आत्मविश्वास वाढतोय. शिवाय योगसाधनेत मेडिटेशन फार गरजेचं असतं. तेही नियमित सुरू असल्याने कमालीची मन:शांती मिळतेय. पूर्वी सतत चिडचिड, त्रागा करणारी मी आता एखादी नावडती गोष्ट, घटना सहज सोडून द्यायला शिकलेय. कोणत्याही गोष्टीचा लोड घ्यायचा नाही. शांत राहायचं आणि गरज असेल तिथंच बोलायचं.

योगमुळे माणूस शरीराशी बोलू शकतो. प्रत्येक अवयवाशी माणसाचा संवाद होतो. त्यामुळे शारीरिक व्याधी कमी होतात. कोणताही आजार असो, व्यंग असो, रोग असो यातून दिलासा मिळवायचा असेल तर योगसाधनेशिवाय पर्याय नाही. औषधांमुळे शरीर बळकट होईलही पण योगसाधनेमुळे मनाला बळकटी येते आणि त्यामुळे जगण्याला बळ मिळतं.

योग हे काही कोणतंही औषध नाही की ज्याचा लगेच परिणाम जाणवायला. योग ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. संयम आणि सातत्य ठेवल्यास नक्कीच परिणाम जाण‌तो. शरीरावरही आणि मनावरही.

Comments

Post a Comment

Popular Posts