मासिक पाळीतील पर्याय आणि महिलांमधील अज्ञान


दोन वर्षांपूर्वी ‘सैराट’मुळे प्रसिद्ध झालेली अर्ची सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ही चर्चा आहे तिच्या नव्या जाहिरातीची. सॅनिटरी नॅपकिन्स बनवणार्‍या एका मोठ्या कंपनीनं आता ‘टॅम्पोन’ भारतात सहजरित्या उपलब्ध करून दिलंय. मुळात टॅम्पोन भारतात खूप आधीपासूनच उपलब्ध होतं. पण जागतिकीरणाच्या पिछाडीवर असलेल्या भारतात हे उत्पादन सहजरित्या उपलब्ध होत नव्हतं. त्यासाठी ऑनलाईन खरेदीच करावी लागत होती. मात्र आता मोठ्या कंपनीनंच हे उत्पादन प्रत्येक मेडिकलमध्ये उपलब्ध करून दिल्याने त्याची खेरीद सहजरित्या करता येणार आहे. पण मुळात ज्या देशात सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच योग्यपद्धतीने जनजागृती झालेली नसताना टॅम्पोनचा किती आणि कसा खप होईल हा प्रश्नच आहे.
सॅनिटरी नॅपकिन्सविषयी माहिती काढताना असं समोर येतं की याचा वापर 1880 नंतर सुरू झाला. भारतात तर आता बारा-पंधरा वर्षांपासून याची विक्री सुरू झालीय. ग्रामीण भागात आजही महिला कापडाचा किंवा पानांचा वापर करतात. खरंतर सॅनिटरी नॅपकिन्सपेक्षा सुती कापड हा सर्वात उत्तम पर्याय आहे. पण हे सुती कापड स्वच्छ धुतल्यानंतर योग्यपणे वाळलं पाहिजे आणि मगच त्याचा पुन्हा वापर केला पाहिजे. पण आपल्याकडे मासिक पाळीतील हेप कापड अंधार्‍या खोलीत ठेवून सुकवलं जातं. त्यामुळे योग्यप्रकारे ऊन न मिळाल्याने या कापडातील जंतूंचा नाश होत नाही. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच स्त्रीरोगतज्ज्ञ शक्यतो सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा सल्ला देतात.
मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं म्हणजे चैन करणं, अशाही प्रतिक्रिया काही महिलांकडून व्यक्त होतात. मुळात जी प्रक्रिया नैसर्गिक आहे, त्या प्रक्रियेसाठी लागणार्‍या साधनसामुग्री चैनीच्या कशा असतील? असो, अशा वातावरणातच आता टॅम्पोन बाजारात उपलब्ध झालंय. तसं पाहायला गेलं तर टॅम्पोनची विक्री फार पूर्वीपासूनच ऑनलाईन बाजारात होत होती, मात्र एका प्रसिद्ध कंंपनीने ही विक्री आता किरकोळ बाजारातही उपलब्ध करून दिल्याने अनेकींना या उत्पादनाविषयी कळायला लागलंय. शिवाय सॅनिटरी नॅपकिन्सला ऑनलाईन बाजारात मॅनस्ट्रुअल कपसारखेही अनेक पर्याय आहेत. देश-विदेशात या पर्यांयाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पण भारतात मासिक पाळीविषयी असलेल्या अनेक गैर समजुतींमुळे महिला असे उत्पादन वापरण्यास धजावत नाहीत.
रिंकू राजगुरुची टॅम्पोनविषयीची ही जाहिरात टीव्हीवर आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सॅनिटरी नॅपकिन्ससारखीच दिसणारी पण आकाराने लहान असणारी ही वस्तू ‘त्या’ काळात आपल्याला स्वच्छ कसं ठेवेल? त्या काळात जर जास्त रक्तस्त्राव झाला तर हे आपल्याला सुरक्षित ठेवेल का? सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणेच याचीही किंमती महाग असेल का? असे अनेक प्रश्न मुलींना पडले. या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी गुगलचा आधार घेतला आणि त्यांच्या दृष्टीस अनेक गोष्टी आल्या. ज्या कंपनीने जाहिरात करून टॅम्पोनविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय त्याच कंपनीने युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओही अपलोड केले आहेत. याद्वारे त्यांनी टॅम्पोनच्या वापराविषयी अनेक खुलासे केले आहेत. ही एवढीशी वस्तू आपल्या योनीत टाकली की मासिक पाळीतील अनेक त्रासापासून आपली सुटका होईल. धावपळीच्या युगात बाह्यवस्त्रांना डाग लागण्याची भिती असते, घडाळ्याच्या काट्यावर जगणार्‍या स्त्रियांना कधीकधी पॅड बदलण्याचंही भान राहत नाही. एवढंच नव्हे तर अनेक शारिरीक दुखण्यालाही त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा काळात टॅम्पोन किती महत्त्वाचं आणि फायदेशीर आहे असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं. टॅम्पोनमुळे रक्तस्त्रावाचे डाग लागण्याची शक्यता कमी असते. तसंच, सॅनिटरी नॅपकिन्सच्या ओलाव्यामुळे सतत वाटणारी भितीही टॅम्पोनचा वापर करताना वाटत नाही. मात्र तरीही टॅम्पोनविषयी अनेक प्रश्न उरतातच. या मासिक पाळीच्या दुखण्यापासून सुटका होताना इतर गोष्टींचा ससेमिरा आपल्या मागे नाही ना लागणार याची भिती तरुणींना वाटणं साहजिकच आहे. कारण ही वस्तू थेट योनीतून मासिक पाळीचा रस्तस्त्राव शोषून घेणार असल्याने आपलं कौमार्य अबाधित राहिल ना? हे टॅम्पोन बाहेर काढताना त्याची दोरीच जर तुटली तर टॅम्पोन बाहेर काढण्यासाठीचा दुसरा पर्याय काय? किंवा मुळात मासिक पाळीतील रक्तस्त्राव बाहेर पडणं हे नैसर्गिक आहे मग तो अशाप्रकारे रोखणं अनैसर्गिक नसेल का? याविषयी अनेक प्रश्न तरुणींनी या व्हिडिओच्या कॉमेंट्समधून विचारलेले आहेत.
ज्यांनी टॅम्पोन वापरून पाहिलंय त्यांनी या टॅम्पोनचं कौतुकच केलंय. शिवाय सॅनिटरी नॅपकिन्सपेक्षाही टॅम्पोन किती फायदेशीर आणि सोयीस्कर आहे याचीही महिती काही वापरकर्त्यांनी दिलीय. मात्र याचा वापर न केलेल्या अनेकींनी हे उत्पादन न वापरण्याचा सल्ला दिलाय.
एकंदरीत काय टॅम्पोनच्या वापराविषयी निर्माण झालेल्या कोणत्याच प्रश्नांची सडेतोड उत्तरे आज गुगलवर नाहीत. ज्या देशात सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच योग्यप्रकारे जनजागृती झालेली नाही त्या देशात टॅम्पोनसारखी उत्पादनं रुळायला बराच वेळ लागणार हे जगजाहिर आहे. त्यामुळे अशाप्रकारची निर्मिती करणार्‍या उत्पादकांनी गावागावत जाऊन मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी घेण्यात येणार्‍या उपाययोजनांविषयी माहिती द्यायला हवी. तरच, देशातील महिलांची मासिक पाळीच्या काळात होणार्‍या त्रासातून सुटका होईल. 

Comments

Popular Posts