स्वर‘मानसी’


संगीत कुठे नसतं? निसर्गानं चराचरात संगीत निर्माण केलं आहे. पावसाचा रिमझिम आवाज, पानांचं सळसळणं, पक्ष्यांचं कुहूकुहू करणं, वार्‍याची झुळूक अनुभवणं, या सार्‍यात संगीत भरलेलं आहे. फक्त हे संगीत ऐकण्यासाठी समोरच्याकडे संगीताचे कान असायला हवेत. संगीताची साधना करणार्‍या, संगीताला जीवन माणणार्‍या रसिकाकडेच असे कान असतात. मानसी केळकर तांबे याही त्यातीलच एक. गेल्या 16 वर्षांपासून ‘स्वरमानस’मधून कलेच्या विविध माध्यमांचा वापर करत त्या अबालवृद्धांना संगीत शिकवत आहेत.
प्रत्येकाला गायनाचा गळा नसतो. कोणाचे सूर लागत नाहीत, कोणी तालात कमी असतो. पण प्रत्येकाला गायनाची हौस असते. हीच हौस भागवण्यासाठी मानसी केळकर-तांबे यांनी 16 वर्षांपूर्वी स्वरमानस या संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत मानसीताई एका वेगळ्या पद्धतीने गाणं शिकवतात. आता ही वेगळी पद्धत म्हणजे नेमकी कोणती? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. ही वेगळी पद्धत म्हणजे गाणं डिझाईन करणं! गाण्याचं एक्स्प्रेशन तयार करणं, हातवारे गाण्याची रचना करणं म्हणजेच गाणं डिझाईन करणं. गाणं ‘डिझाईन’ केल्याने अ‍ॅनी बडी कॅन सिंग ही त्यांची टॅगलाईन त्यांनी सार्थकी लावली आहे.
मानसी ताई म्हणतात की, ‘माझ्याकडे गायन शिकायला आलेल्या मुलांची मी कधीच ऑडिशन घेत नाही. माझ्याकडे गाणं शिकायला कोणीही येऊ शकतं. मुलांनी यावं, मनमोकळेपणानं बागडावं आणि हसत खेळत गाणं शिकावं बस्स.’
मानसीताई उत्तम नर्तिकाही आहेत. खरेतर त्यांना नृत्याची, अभिनयाची फार आवड. म्हणून त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. आई उत्तरा केळकर यांच्यामुळे गाणं त्यांना त्यांच्या घरातच मिळालं. शिवाय गाणं शिकताना विविध गायकांचे संस्कारही त्यांच्यावर झाले. फिलॉसॉफीमध्ये एमए केल्याने लोकांशी संवाद साधणं, त्यांना समुपदेश करणं यात त्यांचा हातखंडच बसला. गाणं, नृत्य, अभिनय आणि समुपदेशक एवढे सारे कलागुण अंगाशी असल्याने त्यांनी या कलागुणांचा वापर करण्याचं ठरवलं. मुख्यत्वे त्यांनी गायनावर अधिक भर दिला. मानसीताई म्हणतात की, ‘माझ्यावर आईने गायनाचे संस्कार केले असले तरीही मी आईसारखं मधूर गाऊ शकत नाही. माझ्यासारखेच अनेक रसिक असतील ज्यांना गायनाची आवड आहे मात्र सूर, तालात ते कुठेतरी कमी असतील. अशाच लोकांसाठी मी स्वरमानसची स्थापना केली. या स्वरमानसमधून मी लोकांमध्ये गायनाचा आत्मविश्वास निर्माण केला. त्यासाठी मला गाण्याचं डिझाईन करावं लागलं. गाणं शिकवताना हातवारे करणं, चेहर्‍यावर एक्स्प्रेशन खुलवणं, यातून मी माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना गाणं शिकवू लागले. यात माझ्या नृत्याचा, अभिनयाच्या गुणांचाही वापर झाला. शिवाय माझ्या समुपदेशनामुळे मी कित्येकांना आत्मविश्वासही मिळवून दिला आहे.’
मानसी केळकर-तांबे या माणूसप्रिय व्यक्तीमत्व आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींशी त्या सतत संवाद साधतात. मानसी या व्यवसायाने समुपदेशकही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे समुपदेशनासाठी येणार्‍या लोकांवर त्या म्युझिक थेरेपीचा वापर करतात. म्युझिक थेरेपीमुळे त्यांनी कित्येकांना नैराश्यातून बाहेर काढलं आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मानसीताईंना अस्थामाचा त्रास आहे. लहानपणापासूनच त्यांना अस्थमा असल्याने श्वसनाचा त्रास जाणवतो. गायनात श्वसनाचा खूप मोठा आधार असतो. पण त्यांनी अस्थमावर मात करीत आपलं गायन अविरत सुरू ठेवलंय. कलेच्या विविध प्रकारात पारंगत असणार्‍या मानसी यांनी स्वरमानसच्या निमित्ताने कित्येकांचे आयुष्याचे तालात आणले आहे, कित्येकांच्या आयुष्यात सुरांची उधळण केली आहे. त्यामुळे नवरात्रीत आदिशक्तीचा गौरव करताना मानसी यांचाही गौरव करणं म्हणजेच त्यांच्या अंगी असलेल्या कलेचाच गौरव करण्यासारखं असेल. 

Comments

Popular Posts