लक्ष्मी, सरस्वती आणि चंडिका


शारदेय नवरात्र सुरू झाल्यापासून अनेक प्रसिद्धी माध्यमांनी देशभरातील कतृत्वान महिलांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली, या मुलाखतीतून या महिलांचा सन्मान, गौरव केला. त्यांच्या कार्याची वाहवा केली, त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिलं. पण या प्रत्येकीला या पदावर पोहोचण्यासाठी किती अग्नीदिव्यातून जावं लागलं असेल हे एका मुलाखतीतून बाहेर पडणारं नाही. कारण घरातून बाहेर पडल्यावर पावलोपावली त्यांना महिला म्हणून आपण किती सक्षम आहोत हे सतत अधोरेखीत करावं लागलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिल्यानंतर भारतात कित्येक महिलांनी गगन भरारी घेतली. ही भरारी घेतानाही त्यांना अनंत अडचणी आल्या आणि जोवर पुरुषप्रधान संस्कृती आपल्या भारतात आहे तोवर या अडचणी भारतातील समस्त महिलावर्गाला येतच राहतील, यात किंचितशीही शंका नाही. विसाव्या शतकात महिलांची जी परिस्थिती होती, तीच एकविसाव्या शतकातही आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजली गेली आहेत. ही खोलवर रुजलेली मुळे उपटून काढण्यासाठी ज्या महिलांनी पुढाकार घेतला तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यातील चंडिकेलाही झुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हारेल ती चंडिका कसली? समाजातील कित्येक चंंडिकेने आपलं काम अविरत सुरू ठेवलं आहे. चुल आणि मुल सांभाळणार्‍या महिलेने स्वतःची आर्थिक गणितं बांधायला घेतली. म्हणूनच लोणची पापडपर्यंत मर्यादित राहणार्‍या स्त्रियांनी उच्च शिक्षण घेऊन औद्योगिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातही भरारी घेतली. मात्र उच्चशिक्षण घेऊन, मोठ्या पदावर पोहोचूनही त्यांच्या पदरी अवहेलनाच आली. याचेच उदाहरण म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत घडलेली घटना. आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहतूक सुरक्षारक्षकाला भरचौकातून फरफटत नेण्यात आलं. कारवाई होण्यापासून वाचण्यासाठी या वाहनचालकाने गाडी जोराने पळविली त्यामुळे कर्तव्यावर असलेली वाहतूक सुरक्षारक्षक फरफटत गेली. मात्र तिच्याच समयसुचकतेमुळे हा आरोपी पकडला गेला. अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजुला घडत असतात. सरकारी कामातील ही तर्‍हा तर कॉर्पोरेट ऑफिसमधील तर्‍हा निराळीच आहे. पदोन्नती असो वा पगारवाढ, तिची प्रत्येकवेळी अवहेलनाच झाली आहे. पुरुष कर्मचार्‍यांच्या तुलनेत महिला कर्मचार्‍यांना आजही कमी पगार दिला जातो, तिला नवनव्या संधींपासून रोखलं जातं, तर काही ठिकाणी नव्या संधीसाठी महिलेला तिचं चारित्र्यच गहाण ठेवावं लागतं. मी टू चळवळीमुळे अशी कित्येक प्रकरणं गेल्या दोन आठवड्यापासून बाहेर पडत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्त्रीशिक्षणासाठी चळवळ उभी करावी लागली तर आता सुशिक्षित स्त्रियांवर अत्याचार होऊ नये म्हणून मीटू चळवळ उभी करावी लागते आहे. याचाच अर्थ असा की महिलांना प्रत्येकवेळी स्वअस्तित्वासाठी चळवळींचाच आधार घ्यावा लागला आहे. मीटू चळवळ पुन्हा सक्रिय झाल्यापासून प्रत्येक क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. आता ही चळवळ किती यशस्वी होतेय हे येणारा काळच ठरवेल. अन्याय अत्याचार्‍याच्या जोखाडातून महिला अद्यापही बाहेर निघालेली नाही याचे पुरावे वर्तमानपत्रातून रोज प्रसिद्ध होणार्‍या बातम्यातून कळतेच आहे. घर, ऑफिस, रस्ता, रेल्वे, बस आदी नाना ठिकाणी महिला अजूनही असुरक्षित आहे. असं असताना आपण अंबेमातेची पूजा का करावी? आपल्या घरातील स्त्रीला अन्यायात ठेवून पाषणातल्या देवीला पूजायचे? मूर्तीतील देवीसमोर नतमस्तक होताना घरातील देवीला आपण लाथाडायचे ही संस्कृती आपली नव्हतीच. देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे असे वाटत असेल तर आपण आधी घरातील स्त्रियांचा आदर करायला हवा. आपल्या घरातील दुर्गेवर कोणताही अत्याचार होता कामा नये, कोणतीही सरस्वती शिक्षणापासून वंचित राहू नये, घरातील लक्ष्मीला पैशांसाठी दुसर्‍यांकडे याचना करावी लागू नये, कोणत्याही पार्वतीचा जीव हुंडाबळीतून जाऊ नये, कोणत्याही सीतेला अन्याय, दुजाभाव सहन करावा लागू नये आणि कोणत्याही कालीमातेला तिच्या रंगावरून तिला कमीपणा येऊ नये, या सार्‍या गोष्टींची तुम्ही आम्ही काळजी घेतली तरच सिंहासनावर विराजमान झालेली ही अंबामाता सगळ्यांवरच प्रसन्न राहिल. आणि असे जर होणार नसेल तर येत्या काळात महिलाच स्वतःच्या बॉडिगार्ड होतील, कारण ती जशी लक्ष्मी आहे, सरस्वती आहे तशीच ती चंडिकेचंही रुप धारण करते. ही चंडिका चारीमुंड्या चित करणारी रणरागिणी ठरेल.

Comments