T1 Avani tigress : कुठे शोक तर कुठे दिलासा

t1, avani was kiiled, yavatmal, why avani killed, sudhir mungantivar, man eater avani, reality behind avani killed,
Avani was killed in yavatmal


बरोबर आठवड्याभरापूर्वी अवनीचा मृत्यू झाला. वनविभागाने शार्पशुटर्स बोलावून टी 1 वाघिणीला ठार केले. यानंतर सर्वच स्तरातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला. एकीकडे वाघिण ठार झाल्यानंतर गावकर्‍यांनी जल्लोष केला तर दुसरीकडे प्राणीमित्र संघटना मात्र चौताळल्या. वाघिणीला मारण्यापेक्षा तिला बेशुद्ध करून बंदिस्त करता आले असते असे अनेक सल्ले वनविभागाकडे येऊ लागले. 13 जणांचा बळी घेतलेल्या वाघिणीने यवतमाळ येथील पांढरकवडा या गावात दहशत माजवली होती. दोन बछड्यांची आई असलेल्या या वाघिणीच्या दहशतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामेही जवळपास ठप्प झाली होती. सोयाबीनचे व कपाशीचे पीक शेतात असूनही ते काढण्यासाठी शेतात जायला कुणीही तयार होत नव्हते. गावातील मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे काही मजुरांनी गाव सोडून मजुरीसाठी दुसर्‍या गावाकडे धाव घेतली. भुलगड, विहिरगाव, लोणी, बोराटी, खैरगाव, येडशी, तेजणी, जिरा, मिरा, सखी, सराटी, झोटींगधरा, तेजनी आदी गावे अवनी वाघिणीच्या वावरामुळे धास्तावले होते. म्हणूनच तिला मारण्याचा घाट घातला गेल्याचे स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मात्र त्यांच्या या कृत्याला त्यांच्याच पक्षाच्या मनेका गांधी यांनी कडाडून विरोध केला. अवनीच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमात पोहोचताच जिथे तिथे सरकारवर शरसंधान करण्यास सुरुवात झाली. मात्र या सार्‍या टिकांना न जुमानता गावकर्‍यांनी जल्लोष केला. गावकर्‍यांचा जल्लोष आपण समजू शकतो. त्यांच्या जीवावरची टांगती तलवारच आता दूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना आता मोकळेपणाने वावरता येणार आहे. मात्र या गावकर्‍यांना अवनीच्या मृत्यूमागचे राजकारण अद्यापही कळलेले नाही. अवनीने 13 जणांचा जीव घेतला हा सरकारी आकडा समोर आला असला तरीही त्या माणसांची शिकार अवनीनेच केला असल्याचा कुठलाही पुरावा आलेला नाही. शिवाय अवनी नरभक्षक होती की नाही याचेही पुरावे अद्याप सापडलेले नाही. ज्या प्राण्यांना अन्न म्हणून केवळ माणसंच लागतात त्यांना नरभक्षक म्हणतात. त्यामुळे अवनी पूर्णतः नरभक्षक असल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. अवनीचे ज्या भागात वास्तव्य होते तो भाग अनिल अंबानी या बड्या उद्योगपतीला आंदण दिल्याचीही कानोकानी चर्चा होती. अनिल अंबानींना येथे मोठा सिमेंट प्लांट तयार करायचा होता. मात्र त्यानंतर 4 हजार 800 हजार कोटी रुपयांना ही जागा दुसर्‍याच मोठ्या व्यावसायिकाला विकण्यात आली. मात्र अवनी वाघिण या व्यवसायासाठी डोकेदुखी ठरली. अवनीला येथून हलवण्यासाठी ती नरभक्षक असल्याचे गावात पेरले गेले. मग ग्रामस्थांनीही या अवनीच्या स्थलांतरासाठी मागणी सुरू केली. त्यामुळे तिच्या स्थलांतराचे काम सुरू झाले. त्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज झाली. तिला पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले गेले. तीन मोठे पिंजरे, 500 वन कर्मचारी, खासगी कर्मचार्‍यांची फौजही येथे तैनात करण्यात आली. हवाई शोधासाठी पॅरामिटर होते, तर इटालियन कुत्र्यांनीही शोध घेतला. तरीही ती काही हाती लागेना. वाघिणच ती शेवटी. शेवटपर्यंत लढली. अखेर हैदराबादच्या शार्पशुटर्सना पाचारण करण्यात आले. या शार्पशुटर्सच्या माथी आधीच अनेक वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे गुन्हे आहेत. शुटर नवाब शाफत अली खान याला केवळ वाघिणीला बेशुद्ध करण्याचे आदेश होते. मात्र त्याने थेट डार्ट गोळी मारून ठार केले. अवनी गेली. पण तिच्या मृत्यूमुळे अनेक संशयाचे वलय निर्माण झाले. आता तिच्या बछड्यांचाही शोध सुरू झाला आहे. गुरुवारी अवनीच्या शवविच्छेदनाचा अहवालही सादर झाला. या अहवालात अवनी मृत्यूच्या आधी आठवडाभर उपाशी असल्याची बाब समोर आली. अवनीच्या बछड्यांचा शोध सुरू असतानाच चिखली-आमुरडी या गावात गुरुवारी बछड्याच्या पायाचे ठसे आढळले. या ठशांवर सांडलेल्या लाळेवरून हे बछडे अवनीचेच असल्याचे समोर आले आहे. मात्र अवनी आठवडाभर उपाशी होती याचा अर्थ तिचे बछडेही भूकबळी ठरण्याची शक्यता वनविभागातील अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. भारताचे राष्ट्रीय प्राणीच उपाशी असतील तर या पेक्षा शर्मेची बाब कोणतीच नसेल. बछड्यांचा शोध वनविभागाचे जवळपास 200 कर्मचारी घेत आहेत. अवनी जेरबंद होण्यासाठी जशी मोहिम हाती घेण्यात आली होती, त्याचप्रमाणे तिच्या बछड्यांचाही शोध सुरू आहे. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या 100 ट्रॅप कॅमेर्‍यांच्या फुटेजची तपासणी होत आहे. पथक पगमार्कची म्हणजेच बछड्यांच्या पायांच्या ठश्यांचीसुद्धा पाहणी करत आहेत. ज्या ठिकाणी बछड्यांचा फोटो ट्रॅप होतो त्या दिशेने पथक शोधमोहिमेला निघतात. परिसरातल्या नदीनाल्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी पगमार्क किंवा ट्रॅप कॅमेर्‍यात फोटो आढळत आहेत, त्याभागात पशु वैद्यकीय डॉक्टरांचे पथकही रवाना होत आहे. वन्यप्राण्यांचा जीव संकटात आहे. त्यांच्या जागेवर मानवाने वसाहत केली. त्यामुळा
माणसांच्या वसाहतीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला. यातून या प्राण्यांवर हल्ले करण्याची प्रकरणेही वाढली. त्यामुळे ज्या ज्या मानवी वसाहतीत हे हिंस्त्र वन्यप्राणी आहेत त्यांचे लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक वाघाची अवनीसारखी अवस्था झाली तर व्याघ्रप्रकल्प राबवण्यापुरतेही वाघ भारतात राहणार नाहीत.


Tags : t1, avani was kiiled, yavatmal, why avani killed, sudhir mungantivar, man eater avani, reality behind avani killed, 

Comments

Popular Posts