तू रणरागिणी हो!

धाडस, सोशिक, संवेदनशील, भावनाशील,करारी,आर या पार करणारी, रणरागिणी, मर्दानी, women empowerment,

सोशिक, संवेदनशील, भावनाशील अशा विविध विशेषणांत गुरफटलेली महिलाच बहुतांश वेळा आपल्या आजूबाजूला दिसत असते. अशा वेळी एखादी धगधगती अग्निशिखा दिसून आल्यास मन अभिमानाने भरून येते. अबला म्हणून जे महिलांचे चरित्र रेखाटले जाते त्याला पूर्ण छेद देणारी, ती प्रतिमा पुसून टाकणारी वर्तमानातील आजची महिला सबला आहे याची साक्ष अशी स्त्रीशक्ती देते. अशा खंबीर, करारी महिला देतात. कुणीही जन्मत: धाडसी नसते. पण प्रसंग ओढवल्यावर व्यक्ती जशी वागते, समयसूचकता दाखवते, प्रसंगावधान दाखवते तेच धाडस म्हणून पुढे ओळखले जाते. महिलांना सबला घडवण्यासाठी असाच एखादा प्रसंग पुरेसा असतो. त्या प्रसंगाला सामोरे जाताना एखादी महिला तळपत्या सौदामिनीसारखी चमकून उठते आणि सर्व समाज या स्फुल्लिंगाची चमकून दखल घेतो. मग महिलांना लावली जाणारी आधीची भावोत्कट विशेषणे बाजूला पडतात आणि या विशेषणांसोबतच करारी, आर या पार करणारी, रणरागिणी, मर्दानी अशी विशेषणे सहज तोंडावर येतात. गेल्या आठवड्यात रेल्वेच्या मध्य मार्गावर असाच एक प्रकार घडला. अपंगांच्या डब्यात चढलेल्या एका दृष्टीहीन मुलीने एका वासनांध इसमाला चांगलीच अद्दल घडवली. या मुलीच्या मागे उभा राहून विशाल सिंग हा तरुण तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याने तिला स्पर्श करताच त्या मुलीने त्याचा हात पिळवटून घट्ट धरून ठेवला. तिची पकड इतकी घट्ट होती की वेदनेने कळवळत त्याने अखेर गुडखे टेकवले. आपल्या वडिलांना झाल्या प्रकाराची कल्पना देत या सबलेने पुढचं स्टेशन येईपर्यंत त्याला त्याच अवस्थेत ठेवलं आणि पुढचं स्टेशन येताच या लंपटाला पोलिसांच्या हवाली केले गेले. अवघ्या 15 वर्षांच्या या दृष्टीहीन मुलीचा हा पराक्रम एखाद्या डोळस मुलीलाही प्रेरणा देईल असाच आहे. अनेक आंबटशौकिन अशा दृष्टीहीन मुलींचा गैरफायदा घेण्याचीच संधी शोधत असतात. मात्र अशा मुलींनी स्वतःचं रक्षण करावं याकरता त्यांना शाळेतूनच कराटे, स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. त्यामुळे अशा नकोशा स्पर्शांची जाणीव जरी झाली तरी ते लगेच प्रतिकार वा प्रतिहल्ला करू शकतात. सध्या अशाच प्रतिहल्ल्याची गरज आहे. कारण कितीही कायदे कडक केले तरीही लिंगपिसाटांची संख्या कमी होणारी नाही. त्यामुळे कायद्यावर विसंबून न राहता मुलींनी स्वतः हिंमत दाखवत काही ठिकाणी तरी नराधमांना धडा शिकवायला हवा
धाडस, सोशिक, संवेदनशील, भावनाशील,करारी,आर या पार करणारी, रणरागिणी, मर्दानी, women empowerment,

डोंबिवलीतही एका विवाहित स्त्रीने तुषार पुजारी या शेजाऱ्याला आयुष्यभराची अद्दल शिकवलीएकतर्फी प्रेमातून त्रास देणार्‍या या मजनूचे गुप्तांगच तिने छाटले. एकतर्फी प्रेमातून तुषार सतत त्या विवाहित महिलेला त्रास देत होता. शिवाय त्याने महिलेच्या पतीलाही काहीबाही सांगून भडकवले. त्यामुळे महिलेचा पती तिच्यावर संशय घेत होता. अखेर तुषारच्या जाचाला कंटाळून त्याला कायमची अद्दल घडवायची तिने ठरवलं. एका निर्जन स्थळी त्याला बोलावून या महिलेने त्याला जाब विचारला आणि दोन मित्रांच्या मदतीने तुषारचे बॉबीटच केले. स्त्रीचे रुप हे जसे लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वतीचे असते तशीच ती वेळप्रसंगी चंडिकाही बनू शकते याचे उदाहरणच या महिलेने दिले आहे. प्रत्येक महिलेने असाच निर्भयपणा दाखवला तर समाजातील श्वापदे वठणीवर यायला वेळ लागणार नाही. आपल्यावरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्याला कोणीतरी येऊन मदत करेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा महिलांनीच पुढे होऊन आपला आवाज वाढवला तर अधिक लवकर परिवर्तन घडून येऊ शकेल. नकोसा असलेला स्पर्श, किळसवाणी नजर, गर्दीचा फायदा घेत मारलेला धक्का, अश्लील मेसेज या सार्‍या घटनांमध्ये बहुतेक महिला गप्प राहातात, लोक काय म्हणतील, घरचे आपल्यालाच नावे ठेवतील या दडपणामुळे प्रत्युत्तर देत नाहीत, प्रतिकार करत नाहीत आणि यामुळेच अशा नीच माणसांचे अधिक फावते. पहिल्याच छेडछाडीच्या वेळी जर लिंगपिसाटांच्या सणसणीत कानशिलात लगावली तर पुढच्या वेळेस मुलींकडे नजर वर करून पाहतानाही हे नराधम दहा वेळा विचार करतील. महिलांनी त्यांचे रणरागिणीचे रुप दाखवायलाही आता शिकायला हवे. त्यांच्यातील प्रेम, मायाळूपणा, स्नेहभाव ही दुर्बलता नाही याची जाणीव त्यांनी कधी तरी उग्र रुप धारण करूनही द्यायला हवी. महिलांमध्ये एखाद्या गोष्टीचा सामना करण्याचे बळ असतेच. केवळ या बळाचा वापर महिला करत नाहीत. त्यांच्यातील आत्मशक्तीची जाणीव महिलांना झालेली नसते.  एकीचे पाहून दुसरीलाही आपोआप बळ मिळत जाईल आणि समाजीतल असंख्य महिला आपोआप शक्तीशाली बनतील. त्या गप्प बसणार नाहीत, दडपण झुगारून देतील तर समाजातील लंपट, संधीसाधू व्यक्ती आपोआप वठणीवर येतील. हे घडायलाच हवे.
धाडस, सोशिक, संवेदनशील, भावनाशील,करारी,आर या पार करणारी, रणरागिणी, मर्दानी, women empowerment,



Tags- धाडस, सोशिक, संवेदनशील, भावनाशील,करारी, रणरागिणी, मर्दानी, women empowerment, 

Comments

Popular Posts