बायानों, यांना चपलेने मारा, एक व्हा!


viral aunty, guagram, shivani gupta, copy writer, mall, short dress, ‘Promoting Rape Culture is Not Okay’

चारचौघात कोणा मुलीने सणसणीत शिवी हासडली, नाक्यावरच्या पानटपरीवर शॉर्ट वनपीस घालून कोणी सिगारेट ओढली, काळोख्या अंधारात एखादी बाई रस्त्याने एकटीच घरी जात असेल तर तिच्याकडे सार्‍यांच्या नजरा खिळतात. तिची रस्त्यावरची चाल प्रत्येक रंगेल पुरुषाची नजर वेधून घेते. तिची मादक अदा, चेहर्‍यावरचा मेकअप, कपड्यांची उंची, चपल्लांचा टाच यामुळे पुरुष तिच्याकडे आकर्षिला जातो. आणि म्हणूनच तिच्यावर बलात्कार होतो. महिलांवर बलात्कार होण्याचे हे एकमेव कारण समाजात वारंवार सांगितलं जातं. म्हणजेच महिलांवर होणार्‍या अत्याचाराला केवळ महिलाच जबाबदार आहेत. त्यात पुरुषांचा काही एक दोष नसतो. त्यामुळे तिनेच केवळ बंधनात, नियमांचे जोखड घेऊन आणि स्वतःचे मन मारूनच जगलंपाहिजे असा अलिखित नियम आपल्याकडे पाळला गेला आहे. मात्र याविरोधात जाऊन कोणीही सामाजिक बंधनं झुगारत असेल, स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असेल, स्वतःच्या जीवावर फुशारक्या मारत असेल तर काहींच्या पोटात दुखणे साहजिकच आहे. गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये घडलेला किस्सा हा त्यातलाच एक भाग. पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणींच्या ग्रुपवर एका मध्यमवयीन बाईने प्रारंभी लिहिलीय तशी हीन टिका केली. ही टिका जिव्हारी लावून घेण्यापेक्षा त्या बाईला अद्दल घडवण्यासाठी या तरुणींनी या बाईलाच घेरले. त्यांची बाजू ऐकल्यावर त्या तरुणींना इतर लोकांनीही सहाय्य केलं. झालं असं की शॉर्ट वनपीस घातलेल्या एका तरुणीला या मध्यमवयीन महिलेने बोलावून घेत तिला वाकडेतिकडे सुनावले. ‘तुमच्यासारख्या मुलींमुळेच समाजात बलात्कार होतात. खरेतर तुमच्यावरच बलात्कार झाले पाहिजेत. इथे उपस्थित असलेल्या पुरुषांनी या तिघींवरही बलात्कार केला पाहिजे, हीच यांची लायकी आहे. इतक्या खालच्या थराला गेलेल्या या बाईच्या वक्तव्याचा राग कोणालाही येईल. डोक्यात तिडीक जाणारी तिची ही अपमानस्पद बकबक ऐकवणारा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. शिवानी गुप्ता नावाच्या एका तरुणीने हा व्हिडिओ व्हायरल केला आणि आपल्या समाजात अजूनही ही किड लागलेली आहे याचं दुःख वाटलं. मुलींवर बलात्कार होण्याचे कारण खुद्द मुलगीच आहे, त्यात पुरुषांचा दोष नाही असंच या महिलेच्या एकंदरीत संभाषणावरून वाटत होतं. एक बाई म्हणून आपण दुसर्‍या बाईचा आदर केला पाहिजे. तर ही बाई आपल्याच मुलीच्या वयाच्या तरुणीवर बलात्कार झाला पाहिजे अशी हीन भाषा करत होती. तिच्या अडाणीपणापेक्षा तिची मानसिकता अधिक संतापजनक होती. हा प्रकार घडल्यावर संबंधित तरुणींनी पुकारलेला बंडही कौतुकास्पद आहे. त्यांनी त्या सुशिक्षित असूनही अडाणी असलेल्या महिलेला चांगलेच झापले.
viral aunty, guagram, shivani gupta, copy writer, mall, short dress, ‘Promoting Rape Culture is Not Okay’
हॉटेल सोडून ती महिला मॉलमध्ये शिरली. मात्र तरुणींनी तिचा पाठलाग सोडला नाही. ती जाईल तिथे या तरुणींनी पाठलाग सुरूच ठेवला. ती जोवर सॉरी म्हणत नाही, तिची चुकी मान्य करत नाही तोवर या तरुणींनी तिचा पाठलाग सुरूच ठेवला. उच्चशिक्षित, मोठ्या घरातील असूनही या मुलींच्या ठायी विनम्र भाव जागा होता. या तरुणींच्या जागी इतर कोणी असते तर त्यांनी या बाईच्या थेट मुस्काटात पेटवली असती. तिला पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात डांबलं असतं. मात्र त्यांनी अहिंसा मार्ग पत्कारला आणि या महिलेची विचारसरणी किती जुनाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र जुन्या, धर्मांध चौकटीत राहिलेल्या लोकांना या चौकटीचे जोखड वाटतच नसते. ती चौकट मोडून कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केला की यांच्या भावना भडकतात. म्हणूनच ही बाई शेवटपर्यंत तिच्या मतांवर ठाम राहिली. एवढेच नव्हे तर व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करेन अशीही धमकी दिली. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच की. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटिझन्सने या महिलेच्या फेसबूक पेजला भेट दिली. आणि तिचे काही शॉर्ट वनपीसमधले फोटो व्हायरल केले. सोमा चक्रवर्ती असे या महिलेचे नाव. तिच्या फेसबुकवर तिच्या शॉर्ट वनपीसमधले फोटो सहज दिसतील. मग तिने या तरुणींविरोधात केलेले वक्तव्य कशाच्या जीवावर आणि कोणत्या नियमांत बसून केले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कालानुरुप स्वतःत बदल होणं गरजेचं आहे. दोन पिढींमधील अंतर समजून घेणं आजच्या घडीला कठीण नाही. दोन्ही पिढीतील लोकांनी समजुतीने घेतलं की सारंकाही जुळून येईल. म्हणूनच या तरुणींनी एकही अपशब्द न वापरता, तिचा कोणताही पाणउतारा न करता त्या बाईला अद्दल घडवली. समाजात घडणार्‍या कोणत्याही अनुचित प्रकाराला महिला कधीच कारणीभूत नसते. कारणीभूत असतो तो समोरच्याचा दृष्टीकोन. या व्हिडिओमध्येच एका तरुणीने उपस्थित केलेला प्रश्नही विचार करायला लावणारा आहे. ‘लहान कपडे घातल्यामुळे जर मुलींवर बलात्कार होत असतील तर नवजात मुलींवर बलात्कार का होतात? बुरखा घालून फिरणार्‍या मुली सुरक्षित आहेत का? 80 वर्षांच्या आजीही बलात्कार पीडित कशा असतात? वीर दी वेडिंग नावाचा मध्यंतरी एक चित्रपट आला होता. महिलांच्या एकूणच राहणीमानावर, त्यांच्या जगण्यावर हा चित्रपट बेतला होता. ही घटना कानावर पडताच त्या चित्रपटाची आठवण आली. मुलीचे चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं असतं म्हणे. काचेच्या भांड्याला तडा गेला की त्या तड्याचे व्रण कायम राहतात. आपल्याकडे महिलांना याच काचेच्या भांड्यात तोललं जातं. मात्र तिच्यावर बंधनं लादण्यापेक्षा आपल्या घरातील मुलाला महिलांचा आदर करायला कोणी का शिकवत नाही? बाई चिथवते हा एक टॅग लावला की पुरुष नामानिराळे. पण पुरुषाच्या नजरेतील वासना कोणाला का दिसत नाही. पाहणाऱ्याच्या डोळ्यात वासना ओथंबून वाहत असेल तर चापूनचोपून नऊवारी नेसलेल्या बाईकडेही लोक वाकड्या नजरेने पाहतील आणि ज्याचे भाव शुद्ध आहेत, त्याला शॉर्ट कपडे घातलेली बाईही सुशील आणि सात्विकच वाटेल. शेवटी हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टीकोन झाला. कपड्यांच्या उंचीवरून कधीच बाईचे चारित्र्य ठरवले जाऊ नये. गुरुग्रामसारख्या उच्चभ्रू शहरांत जर अशा गोष्टी घडत असतील तर ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी भयावह असेल.
मुलींनो, या दबावाला, दडपणाला बळी पडू नका. तुमच्यावरही शेरेबाजी होत असेल, तुमच्या राहणीमानावरून तुमचं चारित्र्य ठरवलं जात असेल तर आवाज उठवा, बंड करा. या तरुणी जशा एकत्र आल्या तशा एकजुटीने या जुनाट परंपरावादी आणि अन्यायकारक मानसिकतेचा प्रतिकार करायलाच हवा. त्यासाठी महिला दिनाची गरज नाही. समाज आपणच बदलायला हवा.


viral aunty, guagram, shivani gupta, copy writer, mall, short dress, ‘Promoting Rape Culture is Not Okay’
दैनिक महाराष्ट्र दिनमान

आणखी वाचा- तुच तुझ्या रुपाची राणी गं


Comments

Popular Posts