लहानपण देगा देवा!



ऑप्स-बॅट्स, जॉली, डोंगर का पाणी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर, सोमवार-मंगळवार, लगोरी, सोनसाखळी हे आणि असे कित्येक खेळ आता इतिहासजमा झालेत असं वाटतंय. पूर्वी गल्ली-बोळांतून गोट्या खेळताना, छपरां-छपरांवरून पतंगी उडतानाचे चित्र सहज दिसायचं. पोरा-पोरांमध्ये रडारडी असायची, मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायची. पण हे सारं क्षणिक असायचं. पुन्हा दुसऱ्या मिनिटाला खांद्यावर हात टाकून गावभर हिंडायला मोकळं. चपलेविना संपूर्ण एरिया फिरून येण्यात तर एक वेगळाच माज असायचा. आता जसं नाक्यावरच्या कोपऱ्यावर जाण्यासाठी टुव्हिलर लागते तसं पूर्वी रशीउडी लागायची. आईने भाजी आणायला सांगितली की रशीउडीवर उड्या मारत धावत सुटायचं. पण आता फारसं असं काही दिसत नाही. चाळीच्या कोपऱ्यावर किंवा इमारतीच्या आवारात लहान पोरांना एका जागेवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी खेळताना पाहिलं की फार वाईट वाटतं. या मुलांना भविष्यात कधी मागे वळून पाहायची इच्छा झाली तर यांना काय दिसेल? तंत्रज्ञानानं बरबटलेलं बालपण केवळ! 

वाचा - प्रिय लोकल, लवकर भेटूया

चेंबूरला घरासमोरच एक मोठी भिंत होती. त्या भिंतीपलिकडे मोकळं माळरान. तिकडे आता मोठं मेडिकल कॉलेज झालंय. पण कॉलेज व्हायच्या आधी पूर्णत: मोकळं माळरान होतं. त्या जागेला आम्ही भरणी म्हणत असू. ती जागा इतकी ओसाड होती की घरासमोरच्या भिंतीवर उभं राहिलं की दूरवर असलेलं रेल्वे रुळ दिसायचं. त्या रुळांवरून मालगाड्या जात असत. मालगाडीच्या भोंग्याचा दूरवरून आवाज आला की आम्ही सारे भरभर त्या भिंतीवर चढत असू आणि दूरूनच जाणाऱ्या मालगाडीच्या दिशेने हातवारे करत ओरडत असू. भारी वाटायचं तेव्हा. कोण सरसर वर चढतंय आणि कोण पटकन खाली उतरतंय यावर आमची स्पर्धा रंगायची. पबजीत धाड धाड गोळ्या मारण्यात जो आनंद मिळतो त्यापेक्षा कैकपटीने तेव्हा आनंद व्हायचा. भिंतीवर चढताना, उतरताना अनेकदा पडलो-धडपडलो पण साला कधी रडू आलं नाही. शाळेत असताना कित्येकदा शेका-शेकीचे खेळ खेळले. काहीजण वहीची पानं फाडून त्यात दगड भरून शेका-शेकी खेळायचे. त्यामुळे रक्तबंबाळ होईस्तोवर डोकं फुटायचं. पण कधी याचं अप्रूप वाटलं नाही. डोक्याला हळद चोळली की झाली जखम बरी. कधी डॉक्टरकडे गेले नाही की कधी साधी मलमपट्टी केली नाही. 


वाचा - साप, भिती आणि मी


भांडीकुंडी खेळण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत, क्रिकेट खेळण्यापर्यंत सारे खेळ खेळले मी लहानपणी. त्यामुळे माझं बालपण फार समृद्ध होतं असं वाटतं नेहमी. आताच्या तांत्रिक युगात वावरताना आपण आपल्या बालपणात फार खरं खरं जगलो असं वाटतं. आजही मोबाईल बाजूला ठेवून चाळभर उंडरावं वाटतं, उगीच कोपऱ्यावर बसून गप्पा ठोकाव्या वाटतात, रात्ररात्रभर बॅटमिंटन खेळावसं वाटतं, भर उन्हात उड्या मारत सोमवार-मंगळवार खेळायची इच्छा होते, घराच्या छपरांवर चढून पतंग उडवावेसे वाटतात. पण पूर्वी जसं या साऱ्या गोष्टी सहज शक्य होत्या तसं आता शक्य होत नाही याचं वाईट वाटतं. 

आपण आयुष्यात किती प्रगती करू, किती पुढे जाऊ, किती कमवू यापेक्षाही माणूस म्हणून घडताना आपलं बालपण किती मजेशीर गेलं हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं हे आता उमगायला लागलंय. आजच्या लहान मुलांना जेवण भरवतानाही मोबाईल हातात लागतो. आम्ही तर एक घास काऊचा आणि एक घास चिऊचा यातच आपलं मनोरंजन समजून भरभर जेवून घ्यायचो. 


वाचा - OUR CANCER FIGHTER


प्रत्येकाची जगण्याची दिशा, व्याख्या बदलली आहे. पण यामुळे माणूस म्हणून घडताना ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्याही आपण विसरत चाललो आहोत. जी मजा एकत्र येऊन खेळण्यात आहे ती एकएकट्याने मोबाईलमध्ये रमण्यात नाही. एकत्र बसून हसणं, खिदळणं या आठवणी बनून राहतात शेवटी आणि या आठवणीच जगण्याचं बळ देतात. श्रीमंतीवर, पैशांवर बालपण सुखी, समृद्धी बनत नाही. लहान मुल म्हणून आपण कसे घडतोय यावर बालपण ठरतं. हातातली बॅट उंच धरून सिक्स मारण्यात जी मजा आहे ती मोबाईलच्या स्क्रीनवर कशी येणार? तंत्रज्ञानातून बाहेर पडून खरं जग अनुभवता आलं तरंच पुढच्या आयुष्यात येणाऱ्या खाचखळग्यातून आपण सहीसलामत बाहेर पडू. कारण बालपणातील हे खेळ म्हणजेच रंगीत तालीम असते जगण्याची. 

Comments

Post a Comment

Popular Posts