पॉवरलिफ्टिंगमधील सुवर्ण कमळ ऋत्विका सरदेसाई

भारताचं प्रतिनिधित्व करत अनेक महिलांनी विविध खेळात आपलं नाव प्रस्थापित केलं आहे. मुंबईत राहणारी ऋत्विका सरदेसाई हेही त्यातीलच एख नाव. पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात तिनं केलेली कामगिरी खरोखरच मोलाची आहे.
खेळात करिअर करण्याविषयी ऋत्विका म्हणाली की, ‘लहानपणापासूनच माझ्या घरात खेळाचं वातावरण होतं. माझे वडिलही पॉवरलिफ्टिंगचे विजेते आहेत. पण शालेय जीवनात मी कबड्डीपासून माझ्या खेळाची सुरुवात केली. पण माझ्या अति वजनामुळे कबड्डीत सिलेक्शन होईना. त्यानंतर मी बॅडमिंटनकडे वळले. बॅडमिंटनमध्येही मला पुरेसं यश आलं नाही. त्यानंतर मी हळूहळू पॉवरलिफ्टिंगकडे वळले. माझ्या घरातच पॉवरलिफ्टिंगचे धडे मला मिळाल्याने पुढचा सराव करणं मला सोपं गेलं.’
ऋत्विकाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवलाच आहे, शिवाय एशिया गोल्ड मेडल, एशिया बेस्ट प्लेअर म्हणूनही तिला गौरवण्यात आलंय. कबड्डी आणि बॅडमिंटन सोडून ती जेव्हा पॉवरलिफ्टिंगमध्ये शिरली तेव्हा तिच्यासमोर अनेक आव्हानं होती. वर्षभराच्या आत तिनं तिचं वजन घटवलं. त्यासाठी तिनं एक दिनक्रम आखून ठेवला. स्वत:ला काही नियम आणि बंधनं घातली. त्यामुळे वर्षभराच्या आत तिनं तिचं वजन स्टेबल केलं आणि जोमाने पॉवरलिफ्टिंगच्या सरावाला सुरुवात केली. या सगळ्यांमध्ये तिचे वडिल संजय सरदेसाई यांची तिला मोलाची साथ मिळाली असं ती सांगते. वडिलही याच खेळाशी निगडीत असल्याने त्यांच्या अनुभवांचा तिला चांगलाच फायदा झाला.
ऋत्विका आता बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकतेय. खेळ आणि कॉलेज यामध्ये ती कोणावरही दुजाभाव करत नाही. दोन तास खेळाचा सराव आणि उर्वरित वेळ अभ्यासासाठी देत असल्याचं ती सांगते. घरातून पाठिंबा मिळत असला तरीही शासनस्तरावर या खेळासाठी फार कमी तजवीज करण्यात आल्या आहेत असं ती सांगते. शासनाने या खेळाकडे विशेष लक्ष पुरवलं तर महाराष्ट्रातून असंख्य पॉवरलिफ्टिंग खेळाडू घडू शकतील. कारण एकट्या महाराष्ट्रात ४५ जिल्हा पुरस्कार, ५० छत्रपती पुरस्कार, २ द्रोणाचार्य आणि १ अर्जून पुरस्कार विजेते आहेत, यांना शासनाने मदत केली, त्यांच्यासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या तर जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडू पुढे जातील असं ऋत्विका पोटतिडकीने सांगते. ज्या वयात मुली नटण्या-मुरडण्यात स्वत:चा वेळ वाया घालवतात त्या वयात ऋत्विका इतका दूरचा विचार करते हे ऐकूनच सारेजण थक्क होतात.
ऋत्विका पुढे असंही म्हणते की या खेळाला पूर्वी खूप दर्जा होता, लोक आवडीने या खेळाकडे वळायचे. मात्र मधल्या काळात हा खेळ काळाच्या पडद्यात अस्पष्ट होऊ लागला आहे. पण योग्य मार्गदर्शन आणि खेळाची व्याप्ती वाढवली तर अनेक खेळाडू पुन्हा या पॉवरलिफ्टिंगमध्ये वळतील असं ऋत्विका सांगते.
पॉवरलिफ्टिंग म्हणजे केवळ पुरुषांचा खेळ अशी एक समजूत होती. मात्र ऋत्विकासारख्या अनेक महिला खेळाडूंनी हा समज मोडित काढून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. मात्र या खेळाविषयी आजही अनेक गैरसमज पसरले असल्याचं ती सांगते. महिला या खेळात येतात तेव्हा कालांतराने त्यांचा आवाज बदलतो, चेहऱ्यातही बरेच बदल होतात, एवढंच नव्हे  तर शरीरयष्ठीही पुरुषांसारखी होते असल्याच्या अनेक समजुती महिला खेळांडूमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ऋत्विका  गेल्या ४ वर्षांपासून या खेळात आहे. तिला अशाप्रकारे कोणतेच बदल जाणवले नसल्याचं ती सांगते. त्यामुळे अशा समजुतींना घाबरून कोणीही नवख्या महिला खेळाडूंनी पळू नये असं आवाहनही ती करते. या खेळाच्या सरावाचं योग्य नियोजन, पद्धतशीर सराव केल्यास असे कोणतेही बदल होत नसल्याचं ऋत्विका सांगते.
ऋत्विका ही उत्तम खेळाडू तर आहेच, पण तिला उत्तम स्वयंपाकही येतो. सुगरण असलेल्या तिच्या आईमुळे हा वारसा तिच्याकडे आला असल्याचं ती सांगते. एवढंच नव्हे तर अनेक खेळाडू शरीर स्वास्थ्यासाठी मोठ मोठ्या डायटिशिअनकडे जातात. मात्र ऋत्विका आईच्याच जेवणाला जास्त महत्त्व देते. ती म्हणते की माझी डायटिशिअन माझी आईच आहे. तिच्या हातचं रोज खात असल्यामुळे मला कधीच कोणत्याही डायटिशिअनची गरज भासली नाही.
ऋत्विका आता १८ वर्षापुढील गटात खेळणार आहे. या गटात खेळताना तिला एशिया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवायची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत जेव्हा जगभरातील खेळांडूसमोर भारताचं राष्ट्रगान सुरू होईल तोच क्षण माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण असेल असं ती सांगते.

Comments

Popular Posts