मराठी शाळांनी अद्ययावत होण्याची गरज

marathi school, marathi shala, मराठी शाळा, मुंबईतील मराठी शाळा, marathi teachers,

इंग्रजाळलेल्या महाराष्ट्रात मराठीप्रेमी पालक महासंमेलन भरवण्याची वेळ यावी यापेक्षा अधिक दुर्दैव कोणत्याच भाषेला लाभलं नसेल. आपली भाषा टिकावी, भाषेचा प्रसार प्रचार व्हावा याकरता मराठीप्रेमी माणसाला त्याच्याच राज्यात कठोर परिश्रम करावे लागणे ही खरेच शरमेची बाब म्हणावी लागेल. गेल्या काही वर्षात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाची पाळेमुळे घट्ट होताहेत. त्यामागचे सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजणारा पालकवर्ग. या बदलत्या जगात आपला मुलगा मागे राहू नये ही पालकांची अपेक्षा अगदीच रास्त आहे, मात्र त्यासाठी परकीय भाषेची वाट चोखाळणे चुकीचे वाटते. इंग्रजीचे शिक्षण म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनला आहे, त्यामुळे प्रतिष्ठेपायी पालकवर्ग आपल्या खिशाला भगदाड पाडून मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. पण युनोस्कोसारख्या जागतिक संघटनेनेच मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले आहे हे या पालकांना कोण समजवणार? फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन यांसारख्या आपल्याहून पुढे असलेल्या देशांमधील नागरिकांनी मातृभाषेच्या शिक्षणाला महत्त्व दिले. कारण मातृभाषेचा संबंध मुलांच्या वैचारिक विकासाशी, मेंदूशी येत असतो. पण दुर्दैवाने आपल्या देशात इंग्रजी म्हणजे भविष्य असं मानणारा, आणि ती भाषा यावी म्हणून संबंध शिक्षणच इंग्रजीतून देण्याचा जो एक विचारप्रवाह बळावला आहे तो मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो आहे. आणि यामुळेच भारतातील मातृभाषेतील शाळांना उतरती कळा लागली आहे. त्यात मराठी शाळा अव्वल म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात मराठी शाळा टिकवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय अनास्था असल्यामुळे या शाळा येत्या काही वर्षात नामशेष होतील की काय अशी भिती मराठीप्रेमी पालकांना वाटते आहे. मात्र मराठी शाळांबाबतीत असे अघटीत घडू नये याकरता मराठीप्रेमी पालकांनीच एकत्र यावे याकरताच मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले. आणि या संमेलनामधूनच मराठी शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यावर उहापोह झाला. मराठी शाळा मागे पडण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शाळा संचालकांनी शिक्षण व्यवस्थेत ठेवलेल्या जुन्या पद्धती. आजकालची चार पाच वर्षांची पोरं लॅपटॉप आणि मोबाईल सहज वापरतात मग अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी यापुढची पावले उचलायला हवीत असा विचार मराठी शाळांच्या संचालकांनी केलाच नाही आणि इंग्रजी शाळांच्या संचालकांनी याच गोष्टीचं भांडवल करून शाळांमध्ये अद्ययावत गोष्टींचा भरणा केला.
marathi school, marathi shala, मराठी शाळा, मुंबईतील मराठी शाळा, marathi teachers,
हसत खेळत शिक्षण, ज्ञानरचनावाद शिक्षणपद्धती राबवण्याची गरज असताना मराठी शाळांनी जुनाट शिक्षण पद्धतीच राबवली आणि परिणामी शाळेतील पटसंख्या वर्षानुवर्षे घसरत गेली. इंग्रजी भाषा ही शिकवायलाच हवी. पण इंग्रजी हे शिक्षणाचं माध्यम होता कामा नये. मातृभाषेतील ज्ञान आत्मसात करायला अधिक सोपं जात असल्याने जगभर मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व आहे. मात्र आपल्या भारतात याविरोधात वातावरण निर्माण झाल्याने मातृभाषेत शिकवणार्‍या शाळा कमी होत गेल्या. मराठी शाळांमध्ये पालकवर्ग पुन्हा परतायला हवा असल्यास मराठी शाळा संचालकांनीच पुढाकार घ्यायला हवा. इंग्रजी माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीचे शिक्षण मराठी शाळांमध्येही दिलं जाईल याचा विश्वास मराठी शाळांनी करून दिला पाहिजे. त्यासाठी आवश्यकता सर्व अद्ययावत पद्धतींचा वापर झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचा केवळ पुस्तकी विकास न होता विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे याकरता मराठी शाळांनी सोयी सुविधा तयार केला पाहिजे. मराठी शाळांनी कात टाकायला दुसराही मार्ग आहे. मराठी शाळांतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यास प्रभावी परिणाम घडून येण्याची शक्यता आहे. मराठी शाळेत शिकून गगन भरारी घेणार्‍या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास पालकवर्ग मराठी शिक्षणाकडे वळतील. त्यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातील शिक्षणासाठी जनजागृती उभारली पाहिजे. पण ही जनजागृती आपल्या घरातून सुरू झाली तरच उपयोगी ठरेल. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची इच्छा असते. मात्र आसपासच्या परिसरात चांगल्या मराठी शाळा नसल्याचा ठपका ठेवत ते इंग्रजी माध्यमाची वाट धरतात. मग या शाळा कितीही लांब असल्या तरीही पालक असा खर्च करायला तयार असतात. अशावेळेस हाच खर्च मराठी शाळांसाठी केला तर सगळ्यांच्याच आसपास मराठी शाळा पुन्हा उभ्या राहायला मदतच होईल. मराठी शाळा टिकाव्यात, मराठी शाळांनी कात टाकावी असे केवळ बोलून, चळवळ उभे करून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी सक्षम प्रयत्नांची गरज आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या ज्या पुढार्‍यांनी पुढाकार घेतला आहे निदान त्यांनी तरी आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण दिले तरी समाजात एक आदर्श निर्माण होईल. 

marathi school, marathi shala, मराठी शाळा, मुंबईतील मराठी शाळा, marathi teachers,




Tags- marathi school, marathi shala, मराठी शाळा, मुंबईतील मराठी शाळा, marathi teachers, 

Comments

Popular Posts