काळाच्या पलीकडचा विचार करायला लावणारी मराठी नाटकं
काही कलाकृती अभिजात ठरतात. मराठी नाट्यविश्वात अशा असंख्य कलाकृती होऊन गेल्या, ज्याची चर्चा त्या नाटकाच्या ५० वर्षांनंतरही होते आहे. या नाटकांचे आशय हे काळाच्या पुढे विचार करायला लावणारे होते. गेल्या काही दिवसांपासून मी अनेक जुनी मराठी नाटके पाहिली. अर्थात युट्यूबवर. त्यापैकी विजय तेंडुलकर लिखित शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, जयवंत दळवी लिखित पुरुष, अशोक समेळ लिखित कुसुम मनोहर लेले आणि अजित दळवीलिखित डॉक्टर तुम्हीसुद्धा ही नाटकं दोन-चार दशकं जुनी असली तरीही सद्यस्थितीशी सुसंगत असल्यासारखी वाटतात. या नाटकांची स्वतंत्र समिक्षा लिहिण्याइतपत किंवा परीक्षण करण्याइतपत नाटकामधलं मला फार काही समजत नाही. पण ही आशयघन नाटकं पाहताना गेल्या चार- पाच दशकात समाजात काहीच बदललं नाही याची जाणीव झाली. 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी १९६७ साली लिहिलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकामध्येच एक नाटक रंगवण्यात आलं आहे. नाटकामधील नाटकाची रंगीत तालिम रंगमंचावर सुरू असताना या तालमीत वेगळंच नाटक सुरू होतं अन् मग स्वच्छंदी जगणाऱ्या नायिकेलाच आरोपीच्या पिंजऱ...